तेजसा पायलच्या संशयास्पद मृत्यूची गतीने चौकशी , तिघांना घेतले ताब्यात

मूळच्या बीडच्या असलेल्या तेजसा पायाळ या तरूणीचा पुण्यातील सिंहगड येथे संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. याप्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता सिंहगड पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून तपासाची गती वाढवली आहे. गरोड परिसरात माणिकबाग इथे घरातच एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली होती. तेजसा श्यामराव पायाळ (वय.२६ वर्षे रा. फ्लॅट न.१५ ) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई करत तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेले तिघे जण हे मृत तरुणीचे मित्र असल्याची माहिती आहे. मात्र हत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मयत तरुणी तेजसा पंचशील नगर, पालवन रोड, बीड येथील मूळची राहणारी आहे. तिने एम.बी.ए केले असून नोकरीच्या शोधासाठी पुण्यात भाड्याने फ्लॅट घेऊन ती आई आणि दोन बहिणी समवेत वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वी हे सर्वजन बीड इथे गेले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी ही तरुणी एकटीच परत पुण्याला परतली होती. तिच्या कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तविल्यानंतर पोलिसांनी अधिक तपस सुरु केला. सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधवबागेत या मुलीचा राहत्या घरात मृतदेह मिळाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत तरुणीच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस तपासात तिच्या घरात तीन ते चार दारूच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे या प्रकरणात मृत तरुणीच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी याआधीच स्पष्ट केलं होतं.
पोलिसांनी सांगितले कि , घरात बेडवर तरुणीचा मृतदेह होता. तर घरातले सगळे सामान अस्ताव्यस्त पडले होते . त्यामुळे चोरीचा संशयदेखील पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी संपूर्ण घराची पाहणी केली. तसेच संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या. त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले . दरम्यान, या प्रकरणात मृत तरुणीच्या कुटुंबीयांची आणि तिच्या जवळच्या लोकांची चौकशी करण्यात येणार असून तिचे कॉल रेकॉर्डही पोलिसांनी मागवले आहेत.