Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Politics of Maharashtra : …….आणि मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची आशा मावळली… !!

Spread the love

विधानसभा  निवडणुकीत ५६ आमदारांचे बळ काय मिळाले ? शिवसेनेची आणि त्यांच्या समर्थकांची अवस्था ” चूळ चूळ मुंगळा , पळी पळी तेल ” अशी झाली. जागा कितीही असो , शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनणार अशी गर्जना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आणि त्यांचे एकनिष्ठ कट्टर समर्थक संजय राऊत यांनी हि तळी उचलून आणखी दोन पावले पुढे जात आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून नावही जाहीर करून टाकले, एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या येणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री संबोधित करतील हे जग जाहीर करून टाकले. आता त्याची दुरुस्ती करण्यासाठी रातोरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी सूत्र हातात घ्यावीत असे फलक शिवसेना भवनाच्या परिसरात रातोरात लागले आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे आले आणि त्यांच्या नावाच्या निवडीवर शिक्कामोर्तब होऊन मुख्यमंत्रीपदाच्या अक्षता अंगावर पडण्याच्या आतच आदित्य ठाकरे यांचे नाव मागे पडले.

राज्यातील नव्या सत्ता समीकरणात शरद पवार यांनी त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर भाकरी फिरविण्याचा जो काही निर्णय घेतला आहे तो निर्णय सोनिया गांधी यांच्या शिक्कमोर्तबाने पूर्ण होणार आहे त्यामुळे या प्रक्रियेत तरी शिवसेनेला हातघाईवर येऊन उपयोग नाही. खरे तर पवारांकडे आकडे नाहीत म्हणून ते शांत आहेत अन्यथा ते एकटे शिवसेनेसोबत जाऊन सरकार बनविण्याइतके आकडे त्यांच्याकडे असते तर त्यांना सोनियांच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज नव्हती एव्हाना ते सरकार बनवून मोकळे झाले असते  परंतु परिस्थिती काय आहे हे ते चांगले जाणतात , म्हणूनच त्यांना ” जाणता राजा ” असे म्हणतात पण सेनेच्या हि गोष्ट अजूनही लक्षात येत नाही. तिन्हीही पक्षात किमान समान कार्यक्रम  ठरला असल्याचे तिन्हीही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले असले तरी सोनिया गांधींनी यावर आपले मत दिले नसल्याने नव्या सत्ता समीकरणावर भाष्य करणे शक्य नाही. जरी इलेक्ट्रॉनिक माध्यमे काहीही बातम्या देत असले तरी…

दरम्यान आधीच शिवसेनेला कायम दुय्यम  वागणूक देणाऱ्या भाजपकडून ५६ जागांवर मुख्यमंत्री दिले जाईल याची सूतराम शक्यता नसतानाही शिवसेनेचे झुंजार  सेनापती संजय राऊत यांनी गेल्या २० दिवसांपासून ” श्री स्वामी समर्थ ” सारखी ” शिवसेनेचाच मुख्यमंत्री ” अशी जी टेप लावली ती बहुतेक शिवसेनेचा मुंख्यमंत्री झाल्यावरच बंद होईल असे वाटत आहे. पण आता ५६ आमदार हाताशी असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री नेमका कधी होणार ? हे सांगणे अवघड आहे. अर्थात स्वतः उद्धव ठाकरे यांनी ” एक ना एक दिवस , शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखविणारच” असे अनेक वेळा पत्रकारांशी बोलताना सांगितले परंतु पत्रकारांनी त्यांच्या निवेदनातला ” एक ना एक दिवस ”  हा शब्दच डिलीट  करून टाकला आणि ” शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखविणारच” हाच  शब्द चालविण्यात , वापरण्यात येत आहे.

लोकांनाही ५६ आमदारांच्या जीवावर शिवसेनेची  मुख्यमंत्री बनविण्याची जिद्द अनाठायी वाटत आहे त्याचे कारण १९९५ मध्ये केवळ आठ आमदार भाजपपेक्षा अधिक असताना शिवसेनेने कधीही भाजपला अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद दिले नाही. त्यामुळे स्वतःचे १०५ आमदार असताना भाजप शिवसेनेला मुख्यमंत्री देणे शक्य नव्हते. याउलट विचार करता समजा विधानसभेच्या निकालात उलट झाले असते म्हणजे शिवसेनेला १०५ जागा मिळाल्या असत्या आणि भाजपाला ५६ जागा मिळाल्या असत्या तर शिवसेनेने भाजपाला मुख्यमंत्रीपद पुन्हा दिले असते का ? असा प्रश्नही चर्चिला जात आहे. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपशी असलेली महायुती सोडून काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आश्रयाला जायला नको होते हीच भाजप -सेना समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे.

खरे तर कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहणे हा काही गुन्हा नाही , तसे जर का उद्धव ठाकरे यांनी स्वप्न पहिले असेल आणि ते म्हणतात तसे त्यांच्या पिताश्रींना वाचन दिले असेल तर जरूर त्यांनी  आपला हा संकल्प आपल्या पक्षाचे बहुमत आणून पूर्णत्वास नेऊन वचनपूर्ती करावी , पण आपल्या  ह्या एका हट्टासाठी त्यांनी महाराष्ट्राला बिना सरकारचे ठेवण्यास आणि राष्ट्रपती राजवट लागू होण्यास कारण ठरावे हे सर्वसामान्य जनतेला योग्य वाटत नाही. भाजपने शिवसेनेच्या या अशा वागण्याला महायुतीला मिळालेल्या “जनमताचा  अनादर” असे म्हटले आहे. अर्थात त्यांच्या म्हणण्यानुसार भाजप सेना आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या आघाडीला सरकार बनविण्यासाठी राज्यातील मतदारांनी सरकार बनविण्यासाठी स्पष्ट कौल दिलेला होता परंतु मुख्यमंत्री पदाच्या वादातून त्यांनी भाजपाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने सरकार बनविण्याचे खेळ सुरु केले आहेत. असा भाजपचा आरोप आहे.

दरम्यान हा खेळ रंगविण्यासाठी शरद पवारांनी त्यांचे सारथ्य केले आहे. त्याचे कारणही भाजप विरोध आहे. अर्थात ज्या पद्धतीने भाजपचे नेते मोदी-शहा शरद पवारांशी  वागले त्याच्या रागातून त्यांनी हा निर्णय घेणे सहाजिक आहे परंतु  ज्या पक्षाला पवारांनी सातत्याने जातीय आणि धर्मांध म्हटले  त्याच पक्षाला त्यांनी सरकार बनविण्यासाठी मदत करणे हे हि लोकांच्या पचनी पडत नाही. परंतु पवार हे , जाणून आहेत कि , या खेळात जोपर्यंत काँग्रेस येणार नाही तोपर्यंत हा खेळ रंगणार नाही त्यामुळेच  त्यांनी काँग्रेसला सोबत आण्यासाठी आधी त्यांच्या राज्यातील नेत्यांना तयार केले आणि आता ते त्यांच्या नेत्या सोनिया गांधी यांना तयार करीत आहेत . मात्र या खेळात आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनविण्याची घाई झालेल्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कसे आवरावे हेच पवारांना कळेनासे झाले आहे . कारण  सोनिया गांधी यांच्याकडून भिन्न विचारधारा असलेल्या शिवसेनेसारख्या पक्षासाठी पाठिंबा आणणे इतके सोपे नाही हे पवारांना माहित आहे . म्हणून ते शांततेने आणि सबुरीने बोलत आहेत तर इकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनीच  शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून शिवसेनेने  शिवतीर्थावर तयारी सुरु केली आहे हे विशेष !!

अर्थात  काहीही झाले तरी जोपर्यंत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी तयार होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटत नाही. त्यामुळे  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार येणार का ? हा प्रश्न सध्या तरी कायम आहे. एका बाजूला पवारांच्या मध्यस्थीमुळे हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करु शकतात असे चित्र आहे. मात्र स्वतः   शरद पवार यांनीच १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे असं म्हटलं आहे. सरकार स्थापनेसाठी वेळ लागेल असं वक्तव्य पवारांनी केलं आहे त्यामुळे निदान १७ तारखेला तरी मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची आशा मावळली आहे.

बातमी अशी आहे कि , काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटीदरम्यान चर्चेदरम्यान शरद पवार यांनी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत भाऊ लोखंडे यांच्याशी बोलताना हे वक्तव्य केले .  विदर्भाचा दौरा करुन शरद पवार यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यानंतर नितीन राऊत यांच्या घरी भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी १७ नोव्हेंबर रोजी सत्ता स्थापन होणं अवघड असल्याचं म्हटलं आहे. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असते. त्याच दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असे संकेत दिले जात होते. मात्र शरद पवार यांनी ही शक्यता नाकारली आहे. भाऊ लोखंडे यावेळी “१७ नोव्हेंबरला महाराष्ट्राचा इतिहास बदलून द्या”, अशी इच्छा  शरद पवारांकडे बोलून दाखवली. मात्र १७ तारखेला अवघड आहे अजून भरपूर वेळ लागेल असे उत्तर शरद पवार यांनी दिलं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबरला नवं सरकार स्थापन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र या चर्चांना शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.

आता एकीकडे पवार म्हणताहेत, राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आमची चर्चा काँग्रेस आणि शिवसेनेबाबत सुरु आहे. त्यामुळे या तीन पक्षांनी स्थापन केलेले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार. तिन्ही पक्षांचे सरकार ५ वर्षे चालावे यावर आमची नजर असणारच आहे तर दुसरीकडे या सर्व पार्श्वभूमीवर  देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील आणि अशिष  शेलार काहीही झले तरी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे सांगत असल्याने दाल मे कुछ काला तो नही ना , अशी चर्चा महाराष्ट्रातील नव्या सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने  रंगली आहे आणि आणखी काही दिवस ती रंगणार आहे हे मात्र नक्की.

  • बाबा गाडे , ज्येष्ठ पत्रकार , औरंगाबाद 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!