Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना दिवाळीसाठी मुंबईबाहेर जाण्यास न्यायालयाची सशर्त परवानगी

Spread the love

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सशर्त जामीनावर बाहेर असलेल्या तिन्ही महिला आरोपींना दिवाळीसाठी मुंबईबाहेर जाण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. पण यासाठी तिन्ही आरोपींना त्यांच्या प्रवासाबाबतची सर्व माहिती गु्न्हे अन्वेषण विभागाला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. डॉ. पायल तडवी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप या महिला डॉक्टरांवर आहे.

या प्रकरणातील आरोपी तिन्ही महिला डॉक्टर या डॉ. पायल तडवी यांच्या वरिष्ठ सहकारी होत्या. त्यांच्याकडून होत असलेल्या छळाला कंटाळून २२ मे रोजी डॉ. पायल तडवी यांनी नायर हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये तिच्या रुमवर गळफास घेत आत्महत्या केली. डॉ. पायल तडवी यांचा जातिवाचक टिप्पणी करुन मानसिक छळ केल्याचा आरोप या तिन्ही आरोपींवर होता. या प्रकरणी तिन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे व अंकिता खंडेलवाल यांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने तिन्ही आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. यावेळी त्यांना खटला सुरु असेपर्यंत त्याचप्रमाणे या खटल्याचा निकाल लागेपर्यंत शहराबाहेर जाण्यासाठी उच्च न्यायालयाच्या परवानगीची अट ठेवण्यात आली. त्या अटीनुसार आता कुटुंबासोबत दिवाळी साजरी करता यावी यासाठी तिन्ही आरोपींनी वकील शैलेश खरात यांच्या मार्फत गावी जाण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. त्यानंतर आता त्यांना परवानगी देण्यात आली आहे.

तिन्ही आरोपींना न्यायालयाने मुंबईबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. या तीन आरोपींपैकी दोघीजणी महाराष्ट्रतच असणार आहेत तर एक आरोपी दिवाळीनिमित्त मध्यप्रदेशला जाणार आहे. या संदर्भातील खटला सुरु झाल्यास आपण हजर राहू. पळून जाणार नाही. काही वेळ कुटुंबासोबत घालवायचा आहे, असे तिघींनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!