Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभेसारखं यश मिळाले नाही पण राज्यात महायुतीचेच सरकार , बंडखोरांची हकालपट्टी करणार : चंद्रकांत पाटील

Spread the love

लोकसभेसारखं यश न मिळाल्यां आम्ही चिंतेत आहोत. काम करूनही मतदारांनी कौल दिला नाही. विकास कामाला मतदान केलं नाही. त्यावर आमचं चिंतन सुरू आहे. आमचं काय चुकलं हे मतदारांनी सांगावं, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्यात भाजप-शिवसेनेचंच सराकर येणार आहे. सत्तेचं वाटप कसं करायचं याचा व्यावहारिकपणे निर्णय घेण्यात येणार आहे. महायुतीत न्याय होईल. न्याय म्हणजे कुणावर तरी अन्याय हा आलाच. मात्र सर्वांचं समाधान होईल असा तोडगा काढण्यात येईल, असं सांगतानाच उद्धव ठाकरे काँग्रेसला बळ देणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी केली.

या निवडणुकीत भाजपला बंडखोरीचा मोठा फटका बसला, असं सांगतानाच बंडखोरी करणाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असून सर्व बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. शिवाय कोल्हापुरात भाजपला खातंही खोलता आलं नाही. यापार्श्वभूमीवर निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कोल्हापुरातील पराभवावर भाष्य केलं.

येत्या ३० ऑक्टोबरला आमचा विधीमंडळ पक्ष नेता निवडला जाणार आहे. मात्र लगेचच ३१ ऑक्टोबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार नाही. त्यासाठी थोडावेळ जाईल, असं सांगतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रात येणार की नाही, हे मला माहीत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्या साताऱ्यातील पराभवावरही भाष्य केलं. उदयनराजेंचा पराभव आम्हाला जिव्हारी लागला आहे. त्याचं आम्ही चिंतन करणार आहोत, असं सांगतानाच त्यांना राज्यसभेवर पाठवणार की नाही हे आताच सांगू शकत नाही. मात्र त्यांचा संपूर्ण सन्मान केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निकाल लागल्यापासून राज्याच्या राजकारणात खूप मोठ्या प्रमाणावर कोल्हेकुई सुरू आहे. त्याला काहीच अर्थ नाही. राज्यात गेल्या २० वर्षात विधानसभा निवडणुकीत १०० हून अधिक जागा मिळवणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या केवळ २ जागा वाढल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या १३ जागा वाढल्या आहे. मात्र त्यांच्या मतांची टक्केवारी खूप कमी आहे. आम्हाला राज्यात २५.७५ टक्के मते मिळाली आहेत. शिवाय महायुतीला बहुमतापेक्षाही जास्त जागा दिल्या आहेत, असं सांगतानाच भाजपला आणखी २० आमदरांनी पाठिंबा दिला असून महायुतीला २५ आमदारांनी पाठिंबा दिला असल्याचा दावा त्यांनी केला. निकाल लागल्यापासून कोणीही ईव्हीएमवर बोलत नाही. आता ईव्हीएमवर विश्वास बसला का? असा टोला पाटील यांनी विरोधकांना लगावला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील भाजपच्या पराभवाचं खापर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यावर फोडलं. मंडलिकांनी भाजपविरोधात काम केल्यानं भाजपचा पराभव झाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक असो कागल नगरपरिषदेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक. प्रत्येकवेळी मंडलिक यांनी भाजपविरोधी काम केल्याचा आरोपही त्यांनी केला. मंडलिक हे नेहमीच सोयीचं राजकारण करत असतात त्याची शिवसेनेने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!