Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता…

Spread the love

पुणे : बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याशी (युएपीए) संबंधित प्रकरणांसाठीच्या पुणे येथील विशेष न्यायालयाने आज डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी, सचिन प्रकाशराव अंदुरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर या आरोपींना दोषी ठरवले, आणि त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक 9 मे 2014 च्या आदेशानुसार सीबीआयने पुणे शहरातील डेक्कन पोलीस ठाण्यात यापूर्वी नोंदवलेल्या प्रकरणाचा तपास हाती घेऊन तत्काळ गुन्हा नोंदवला होता. यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर, ऑगस्ट 2013 मध्ये पुणे येथील ओंकारेश्वर पुलावर सकाळी फिरायला गेले असताना दोन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासानंतर सीबीआयने 6 सप्टेंबर 2016 रोजी पुणे येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर, सीबीआयद्वारे 13 फेब्रुवारी 2019 आणि 20 नोव्हेंबर 2019 रोजी पुरवणी आरोपपत्रे दाखल करण्यात आली.

सचिन प्रकाशराव अंदुरे, शरद भाऊसाहेब कळसकर, वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम विनय भावे आणि संजीव पुनाळेकर या आरोपींविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पुणे येथील विशेष न्यायालयात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर सुनावणी करण्यात आली.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील युएपीए प्रकरणांशी संबंधित विशेष न्यायालयाने 10 मे 2024 रोजी दिलेल्या निकालाद्वारे आरोपी सचिन प्रकाशराव अंदुरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर यांना दोषी ठरवले आणि त्यानुसार त्यांना शिक्षा सुनावली. इतर तीन आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!