Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकीय घराणेशाहीवर कन्हैयाकुमारची टीका

Spread the love

‘ईव्हीएम’ हॅकिंगच्या संशयामुळं विरोधकांच्या रडारवर असलेल्या सत्ताधारी भाजपवर आज विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यानं जोरदार हल्लाबोल केला. ‘तुम्ही ईव्हीएम हॅकिंगच्या गोष्टी काय करता, मी ज्या बिहारचा आहे, तिथल्या मुख्यत्र्यांनाच भाजपनं हॅक केलं आहे,’ अशी जोरदार टीका कन्हैयाकुमार याने केली. भाकपचे अहमदनगरमधील उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारसभेत तो बोलत होता. यावेळी त्यानं भाजपवर जोरदार टीका केली.

२०१५च्या निवडणुकीत नीतीश कुमार यांचा संयुक्त जनता दल व लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीनं भाजपचा दारुण पराभव केला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच लालूंची साथ सोडून नीतीश यांनी भाजपशी घरोबा केला होता. ‘हे एक प्रकारचं ‘हॅकिंग’ होतं’, असं कन्हैया यावेळी म्हणाला. ‘भाजपला पर्याय नाही, असं चित्र सध्या निर्माण केलं जात आहे. जाहिरातींचा आधार घेऊन ‘आपले सरकार येत आहे’ असं लोकांच्या मनावर बिंबवलं जात आहे. असंच जर होणार असेल तर देशातील इतर पक्षांवर बंदीच घाला, असा संताप कन्हैयानं व्यक्त केला. महापालिकेची निवडणूक असली तरी भाजपवाले मोदींच्या नावाने मत मागतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबव्यात, तरुणांना रोजगार मिळावे, असे महाराष्ट्रचे प्रश्न आहेत, यावर चर्चाच होत नाही. भाजप हा राजकीय पक्ष नाही, तर प्रत्येक वस्तूचं दुकान बनलं आहे,’ अशी बोचरी टीका त्यानं केली.

राजकीय घराणेशाहीवरही त्यानं जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्रातील बहुतेक पक्षांत घराणेशाही आहे. जनतेच्या प्रश्नावर लढणारा नेता बनला पाहिजे. पण सध्या आधी बाप व नंतर मुलगा नेता होतो. राज्यातील अनेक नेते हे त्यांच्या पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या मागे लागले असतील तर आपल्याला सुद्धा आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक सक्षम राजकीय पर्याय निर्माण करावा लागेल. तो जनतेतूनच करावा लागेल,’ असं तो म्हणाला.

महाराष्ट्रातील ज्या गावात वीज पोहचली नाही, त्या गावात इंजिनीअरिंग कॉलेज पोहचले आहे. ५ लाखांपेक्षा जास्त इंजिनीअर दरवर्षी बनत असले तरी दीड लाख इंजिनीअरनाही इथे नोकरी मिळत नाही. ही इथल्या शिक्षणाची अवस्था आहे,’ अशी खंत त्यानं व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!