एमआरआय मशीन अपघात : मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना १० लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

मुंबईच्या नायर रुग्णालयामधील एमआरआय मशीनमध्ये अडकून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राजेश मारू यांच्या कुटुंबीयांना अंतरिम भरपाई म्हणून दहा लाख रुपये देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. गेल्या वर्षी हा चमत्कारिक अपघात घडला होता.
या विषयी अधिक माहिती अशी कि , फेब्रुवारी २०१८मध्ये राजेश मारू यांचा एमआरआय मशीनमध्ये अडकून विचित्र अपघातात मृत्यू झाला होता. या अपघाताला मुंबई महापालिकेचं नायर रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचं सांगत मारू कुटुंबीयांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर कोर्टाने निकाल देताना मारू कुटुंबीयांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत. दहा लाखांपैकी पाच लाख रुपये फिक्स्ड् डिपॉझिटमध्ये ठेवावेत आणि उर्वरित पाच लाख रुपये सहा आठवड्यांत या कुटुंबाला द्यावेत, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
राजेश मारू हे ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन एमआरआय विभागामध्ये गेले होते. सिलेंडर आत नेण्यास वॉर्ड बॉय वा या विभागातील संबधित डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारे आक्षेप घेतला नाही. त्यामुळे आतमध्ये नेमके काय होते याविषयी कोणतीच कल्पना नसलेल्या राजेश यांचा या विचित्र अपघातात जीव गेला. सिलेंडर आत घेऊन गेलेल्या मारूंना मशिनच्या विद्युतचुंबकीय क्षेत्राने खेचले होते. त्यामुळे मशीनमध्ये अडकून त्यांचा मृत्यू झाला होता.