Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी केंद्राने स्थापन केले मंत्री गट , ३१ ऑक्टोबर रोजी नव्या केंद्रशासित प्रदेशांची स्थापना

Spread the love

जम्मू-काश्मीर आणि लडाख या नव्याने अस्तित्वात येणाऱ्या केंद्रशासित प्रदेशांचा सर्वांगिण विकास तसेच तेथील आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांकडे जातीने लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी मंत्रिगटाची स्थापना केली. हे नवे केंद्रशासित प्रदेश ३१ ऑक्टोबर रोजी अस्तित्वात येणार आहेत.

कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा या मंत्रिगटात समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर व राज्याचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाल्यानंतर तेथील नेमकी स्थिती काय असेल, यावर हा मंत्रिगट लक्ष केंद्रीत करणार आहे. दोन्ही केंद्रशासित प्रदेशांसाठी विविध विकास योजना तसेच आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांबाबत उपाययोजना हा मंत्रिगट सूचवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जम्मू-काश्मीर पुनर्रचना अधिनियम २०१९ अंतर्गत जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश ३१ ऑक्टोबर रोजी अस्तित्वात येणार आहेत. याअनुशंगाने मंत्रिगटाची पहिली बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी तसेच जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी मंगळवारी सचिवस्तरावर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला विविध १५ खात्यांचे सचिव उपस्थित होते. या बैठकीत कालबद्ध कार्यक्रमावर निर्णायक चर्चा झाल्याचे गृह विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. केंद्राच्या योजना या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांत कशा राबवता येतील, यावरही बैठकीत चर्चा झाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!