Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

५ कोटी आणि ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या सरकारी दाव्याला सयाजी शिंदे भिडले , म्हणाले हे तर निव्वळ थोतांड आणि भ्रष्टाचाराचं कुरण !!

Spread the love

“आपल्याकडे २५० जातींची विविध वृक्ष आहेत. मंत्री आणि अधिकाऱ्यांना या झाडांची माहिती नाही. त्यामुळे ते कुठेही झाडं लावत आहेत. त्यांना कोणत्या जागी झाडं लावली पाहिजेत याचीही साधी माहिती नाही. काटेश्वर नावाचं झाडच त्यांना माहीत नव्हतं. या झाडांवर उन्हाळ्यात ४०-५० पक्षी बसतात हे सुद्धा मंत्र्यांना माहीत नव्हतं, ”  असा संताप व्यक्त करतानाच गिरीवृक्षाला सरकारने उंदीरमारे हे नाव दिल्याची टीका सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली आहे.


सिने अभिनेते सयाजी शिंदे आज ५ कोटी वृक्ष लागवड केल्याच्या झाडाच्या दाव्यावरून  थेट सरकारच्या वन विभागाशी चांगलेच भिडले आणि  राज्य सरकारच्या वृक्षरोपणाच्या मोहिमेवर जोरदार हल्ला चढवला आहे. वृक्ष जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सरकारकडे कोणतंही धोरण नसून सरकारची ५ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम निव्वळ थोतांड असून सरकारची वृक्ष लागवड हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे, अशी टीका सयाजी शिंदे यांनी केली आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. परंतु, अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारची ही वृक्ष लागवड योजनाच फसवी असल्याचं सांगत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. हे वृक्ष तुम्ही कुठे लावणार आहात? या वृक्षांच्या संवर्धनाची काय योजना तुमच्याकडे आहे? सरकारच्या नर्सरीमध्ये कोणत्या प्रकारच्या जातीची झाडं असून सरकार कोणत्या जातींच्या झाडांची लागवड करणार आहे? या झाडांचं जतन करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, असे सवाल सयाजी यांनी मुनगंटीवार यांना विचारले आहेत. हा निर्धार ३३ कोटी वृक्षांचा आहे की निराधार वृक्ष आहेत, हे पाहावं लागेल, असा चिमटा त्यांनी काढला.

सरकार केवळ ३३ कोटी वृक्ष लावण्यासाठी कोणत्याही खड्ड्यात झाडं लावत आहे. शाळांच्या अंगणातही झाडं लावली जात आहेत, असं सांगतानाच मी १२ जिल्ह्यांतील २३ ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. मात्र त्याचं कधीच चित्रीकरण केलं नाही. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आम्ही नेमक्या ठिकाणी झाडं लावत आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. सयाजी शिंदे यांनी त्यांच्या ट्री स्टोरी या फाऊंडेशनच्यावतीने वृक्ष लागवडीचं काम हाती घेतलं असून या कार्यात त्यांना अनेक वृक्षप्रेमी साथ देत आहेत.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा 

दरम्यान राज्यात ३३ कोटी वृक्ष लावण्याची मोहीम ही मोहीम नसून एक आंदोलन आहे. मात्र आमच्यावर काही लोक अज्ञानातून आणि माहितीच्या अभावातून आरोप करत आहेत, असं सांगतानाच वन विभाग विविध संस्था आणि संघटनांना सोबत घेऊनच हे आंदोलन पूर्णत्वाला नेत आहे, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. सरकारच्या नर्सरीमध्ये एकूण १५६ जातींचे वृक्ष आहेत. त्याची यादी २८ हजार ग्रामपंचायतींना दिली आहे, असं सांगतानाचा वृक्ष जगवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर जशी आहे, तशी ती आपल्या सर्वांचीच आहे, असंही त्यांनी सांगितलं. प्रत्येक जण वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा भाग व्हावा म्हणून ग्रीन आर्मीही तयार केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!