Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ .पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपपत्रात १६० हुन अधिक जणांचे जबाब , कोण काय म्हणाले ?

Spread the love

डॉ . पायल तडवीच्या आत्महत्येला दोन महिने पूर्ण होत असतानाच मुंबई क्राइम ब्रँचने तिन्ही आरोपी डॉक्टरांवर १,२०३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यात पायलची मैत्रीण व खटल्यातील महत्त्वाची साक्षीदार डॉ. स्नेहल शिंदे  यांचा जबाब महत्वाचा आहे . कित्येक महिने जातीवरून होत असलेला मानसिक छळ, भेदभाव, अपमान यांचा वृत्तांत तपासात संकलित करण्यात आला असून दोषारोप पत्र पूर्ण झाले आहे . पायल तडवी हिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा आरोप डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर आहे.

डॉ. पायल तडवी डॉक्टर होण्यासाठी जळगावातून मुंबईत आली. नायरसारख्या रुग्णालयात आपल्याला शिकण्याची संधी मिळाली, याचा आनंद मानून मोठी स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी तडवी वयाच्या २६ व्या वर्षी रुग्णालयातील वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेते. ‘यांच्याबरोबर (डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल) मी आता एक मिनिटही राहू शकत नाही. गेले एक वर्ष मी त्यांना सहन करत आहे. आता त्यांना सहन करणे अशक्य झाले आहे,’ असे सुसाईड नोटमध्ये नमूद करत आयुष्याचा शेवट हेच या जाचाला उत्तर आहे, असे मानून २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या हॉस्टेलमधील राहत्या रूमवर पंख्याला स्टोल अडकवून पायलने आयुष्याचा अंत केला.

डॉ. स्नेहल शिंदे  यांचा जबाब

पायलने आत्महत्या करण्यापूर्वी स्नेहल आणि पायलचे फोनवर तासभर संभाषण झाले. या संभाषणात पायलने काहीच तासांपूर्वी ऑपरेशन थिएटरमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. ‘मी पायलला शेवटचा कॉल सायंकाळी ४ वाजता केला. या संभाषणात तिने काही तासांपूर्वी ऑपरेशन थिएटर (ओटी)मध्ये काय घडले, हे सांगितले. तिन्ही वरिष्ठ डॉक्टर रुग्ण, रुग्णालयाच्या कर्मचाºयांदेखत तिच्यावर मोठ्याने ओरडल्या. मला वाटते याचमुळे तिने आत्महत्या केली,’ असे स्नेहलने पोलिसांना सांगितले.

स्नेहलशिवाय पायल तिची आई अबेदा तडवी यांच्याची ३:३९ वाजता बोलली. आत्महत्या करण्यापूर्वी अगदी काही मिनिटांपूर्वी म्हणजेच ४:५१ वाजता तिचे आहुजाशी बोलणे झाले. ‘पायलच्या आईने कॉल करून पायल खूप तणावात असल्याचे मला सांगितले. पायलशी याबाबत चर्चा करण्यासही तिने सांगितले. तसेच ती लवकरच जळगावहून मुंबईला पायलला भेटण्यासाठी येत असल्याचेही सांगितले,’ असे शिंदे हिने जबाबात म्हटले आहे.

शिंदेने पायलने आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवसांआधी घडलेला प्रसंग सांगितला. ‘आरोपींनी तिला एएनसीमधून बाहेर करत पीएनसीमध्ये पाठविले. पीएनसीमध्ये कनिष्ठ विद्यार्थी काम करतात. आरोपींनी पायलऐवजी कनिष्ठ विद्यार्थी अनुरूपा हिला एएनसीमध्ये घेतले,’ असे शिंदेने जबाबात म्हटले. तिघी आरोपी जाणूनबुजून पायलला नॅशनल एलिजीबीलिटी कम एन्ट्रान्स टेस्टच्या गुणांबाबत विचारत. ती अनुसूचित जमातीची आहे, हे त्यांना माहीत होते, असे शिंदेने जबाबात म्हटले आहे.

डॉ. झेयान इशरत सय्यद यांचा जबाब 

पोलिसांनी भक्ती मेहरेची हॉस्टेलमधील रूम पार्टनर डॉ. झेयान इशरत सय्यद हिचाही जबाब नोंदविला. तिन्ही आरोपी पायल आणि तिची मैत्रीण स्नेहल हिला जाणूनबुजून अधिक काम देत व त्यांना रुग्णांच्या नोंदीचे काम देत. यामुळे या दोघी रडकुंडीला येत असत, असे सय्यदने पोलिसांना सांगितले.

‘हेमा अधिक तापट आहे. ती कधीकधी वरिष्ठांशी अरेरावीने बोलत असे. हेमा, भक्ती, अंकिता या चांगल्या मैत्रिणी असून नेहमीच पायल कामचोर आहेत, अशी तक्रार करायच्या. त्या पायलचा वारंवार अपमान करायच्या. आॅक्टोबर/ नोव्हेंबर २०१८ मध्ये हेमा, भक्ती वॉर्ड नंबर सातमध्ये होत्या. त्या वेळी मी त्या वॉर्डच्या राऊंडवर होते. त्या वेळी हेमा रुग्णांच्या फाईल्समधून काही कागदपत्रे फाडत असल्याचे मी पाहिले. हा प्रकार त्या आठवड्यात मी दोन-तीन वेळा पाहिला. याविषयी मी विचारणा केल्यावर हेमाने मला यामध्ये पडू नकोस, अशी तंबी दिली. तिचा हा तापट स्वभाव पाहून मी तिला सांगितले की, तुमच्या या स्वभामामुळे तुमची ज्युनिअर आत्महत्या करेल आणि त्या वेळी तुमची बाजू कोणी घेणार नाही,’ असे सय्यद हिने जबाबात म्हटले आहे. पायलने आत्महत्या केल्याचे माहीत असूनही हेमाने आपल्याला याची साधी भणकही लागू दिली नाही. २२ मे रोजी रुग्णालयात ड्युटीसाठी जाताना काही सहका-यांनी पायलने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळाने हेमा कचराकुंडीजवळ उभी असल्याचे आपण पाहिले, असेही सय्यदने पोलिसांना सांगितले.

१६०हुन जणांचे जबाब 

या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी १६० हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात रुग्णालयाच्या कर्मचारीही आहे. तिन्ही आरोपी पायलचा तिच्या जातीवरून अपमान करीत होत्या हे तीन कर्मचाºयांनी पोलिसांना सांगितले. ‘तुमची लायकी फक्त क्लर्क बनायची आहे,’ असा टोमणा एका आरोपीने पायलला मारल्याचे रुग्णालयाच्या एका कर्मचा-याने जबाबात सांगितले.

नायरच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख चिंग लंग च्युंग यांनी आपल्याकडे पायलने या तिघींविरोधात कोणतीही तक्रार केली नसल्याचे पोलिसांना सांगितले. एकदा करण्यात आलेल्या तक्रारीवरून तिन्ही आरोपी डॉक्टरांना त्यांच्या ज्युनियर्सशी नीट बोलण्यास सांगितले होते. त्यानंतर पायलकडे तिघींच्या वर्तनाबाबत विचारणाही केली होती. मात्र, त्या वेळी तिने सर्व व्यवस्थित असल्याचे आपल्याला सांगितले, असे व्युंग यांनी पोलिसांना सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!