Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Odisha : मृतदेह घरी नेण्यासाठी गाडीच उपलब्ध नव्हती म्हणून त्यांनी कापडाच्या झोळीत नेला मृतदेह !!

Spread the love

भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशात ओडिशाच्या कालाहंडी या अतिशय दुर्गम आणि मागास जिल्ह्यामध्ये राहाणाऱ्या एका आदिवासी कुटुंबाबाबत तर अतिशय भीषण प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये मृत झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह घरी नेण्यासाठी गाडीच उपलब्ध न झाल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना तो मृतदेह एका कापडात गुंडाळून घरी न्यावा लागल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकारामुळे इथल्या आदिवासींना स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांतही मुलभूत सोयीही देण्यात प्रशासन कसं अपयशी ठरलं आहे, हेच पुन्हा समोर आलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, निगिडी माझी नावाच्या व्यक्तीला स्थानिक स्वयंसेवी रुग्णालयात ताप आल्यामुळे दाखल केलं होतं. मात्र, उपचारांदरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. पण मृतदेह घरी नेण्यासाठी जेव्हा नातेवाईकांनी अॅम्ब्युलन्स किंवा एखाद्या गाडीची मागणी केली, तेव्हा मात्र मेडिकल ऑफिसरने त्यांना नकार दिला. या नकारासाठी त्याने दिलेलं कारण गंभीर होतं. ‘सोमवारी आम्ही व्हॅन चालवत नाही’, असं उत्तर त्यानं दिलं. त्यामुळे नातेवाईकांचा नाईलाज झाला. मात्र, या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ या नातेवाईकांनी शूट करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळेच सोमवारी घडलेली ही घटना उघड झाली.

दरम्यान, या घटनेवर संबंधित थुआमूल रामपूर सरकारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने एएनआयला दिलेलं उत्तर तर अधिकच धक्कादायक होतं. ‘मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह नेण्यासाठी गाडीचा शोध घेतला. पण त्यांना कोणतीही गाडी मिळाली नाही. आणि आमच्याकडची व्हॅन जुनागढ, कालामपूर आणि थुआमल रामपूर या तीन ठिकाणी जाते. त्यामुळे आम्हाला त्यांना व्हॅन देता आली नाही’, अशी प्रतिक्रिया डॉ. अविनाश यांनी दिली. त्यामुळे इतक्या मोठ्या परिसरामध्ये एकच व्हॅन सेवा देत असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संबंधित रुग्णालयावर सोशल मीडियावर टिकेची झोड उठवली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!