Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कार रस्त्यात का थांबवली ? असे विचारणाऱ्या वाहतूक पोलिसालाच त्यांनी गाडीत बसवून पळविले , दोघे अटकेत

Spread the love

दारुच्या नशेत भररस्त्यात कार थांबवून वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या तिघा तरुणांना हटकणाऱ्या वाहतूक पोलिसाचेच अपहरण करण्यात आल्याची घटना चेंबुरमधील छेडा नगरमध्ये घडली. १५ मिनिटांच्या पाठलागानंतर पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे कार अडवून दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं.

छेडा नगर येथे वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाचे तिघांनी अपहरण केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. हे तिघे तरुण दारुच्या नशेत होते. त्यांनी भररस्त्यात कार थांबवली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वाहतूक पोलीस विकास मुंडे यांच्यासह दोन सहकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. ते कारजवळ गेले आणि त्यांनी कार रस्त्याच्या कडेला नेण्यास सांगितले. तिन्ही तरूण पळून जाऊ नयेत यासाठी मुंडे कारमध्ये बसले. मात्र, तरुणांनी कार न थांबवता मुंडेंना घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस आयुक्त वेंकट पाटील यांच्या पथकाने कारचा पाठलाग केला. पंधरा मिनिटांनंतर पूर्वद्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे कार अडवून त्यातील दोघा तरुणांना अटक केली. एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला.

पोलिसांच्या माहितीनुसार, तिघा तरुणांची ओळख पटली असून, विराज शिंदे, गौरव पुंजवानी आणि राज अशी त्यांची नावे आहेत. शिंदे आणि पुंजवानीला अटक केली. तर राज पळून गेला. तिघेही ठाण्यातील सधन कुटुंबातील आहेत. ते तिघेही पार्टी झोडून घरी जात होते. तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार कांबळे यांनी दिली. तिघे तरुण दारुच्या नशेत होते. त्यांनी भररस्त्यात कार थांबवली होती. ते पळून जाऊ नयेत म्हणून मी कारमध्ये जाऊन बसलो आणि त्यांना कार रस्त्याच्या कडेला थांबवण्यास सांगितले. मात्र, चालकानं कारचा वेग वाढवला. मागे बसलेल्या दोघांनी मला मारहाण केली, असं मुंडे यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!