Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीची स्वतःच्या कुटुंबीयांविरुद्ध तक्रार , संरक्षणाची मागणी

Spread the love

आंतरजातीय विवाह केल्यानं जीवाला धोका असल्याचं सांगत बरेलीतील भाजप आमदाराच्या मुलीनं पोलीस संरक्षण मागितल्याची घटना ताजी असतानाच, अमरोहातही गुज्जर समाजातील तरुणाशी विवाह करणाऱ्या ब्राह्मण समाजातील एका तरुणीनं व्हिडिओ मेसेजद्वारे पोलीस संरक्षण मागितलं आहे. कुटुंबीयांपासून आमच्या दोघांच्याही जीवाला धोका आहे, असा आरोप तिनं केला आहे.

गेल्या आठवड्यात बरेलीतील एका आमदाराच्या मुलीनं सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला होता. आंतरजातीय विवाह केल्यानं वडिलांपासून जीवाला धोका आहे, असं सांगत तिनं बरेली पोलिसांकडे संरक्षण मागितलं होतं. असाच एक व्हिडिओ अमरोहामध्ये शनिवारी रात्री व्हायरल झाला. कुटुंबीयांपासून जीवाला धोका असल्याचं २१ वर्षीय तरुणीनं सांगितलं. दुसरीकडे तिच्या वडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार केली असून, पोलीस तिला शोधण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. माझ्या मुलीला शोधलं नाही तर मी इस्लाम धर्म स्वीकारेन, असा पवित्रा तिच्या वडिलांनी घेतला आहे.

दरम्यान, पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी दोन पथक नेमले असून, एक हापूरकडे, तर दुसरे पथक अलाहाबादला रवाना झाले. तरुणी ही अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर येथील रहिवासी आहे. शेजारच्या लुकालुकी गावातील एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. घरच्यांचा विरोध झुगारून त्या दोघांनी लग्न केलं. तरुणीच्या कुटुंबीयांनी त्या तरुणासह त्याच्या दोन मित्रांविरोधात हसनपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आठ जुलैला त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला. तरुणीला शोधण्यात पोलीस अपयशी ठरले. त्यामुळं तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला होता. त्यात तरुणीच्या वडिलांनी आत्मदहनाचा इशाराही दिला. मात्र, शनिवारी अचानक या प्रकरणानं वेगळे वळण घेतले. मुलीनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तिनं आपलं नाव अनामिका असं सांगितलं.

मी प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले असून, कुटुंबीयांपासून आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे. आमचं काही बरं-वाईट झालं तर कुटुंबीय सर्वस्वी जबाबदार असतील, असं सांगत तिनं पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली. त्यावर अशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मुलीवर सक्ती केली असावी, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!