Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यपालांच्या नावाचा गैरवापर करुन खोटे आदेश दाखवून जमीन घोटाळा , भाजपच्या माजी मंत्र्यांवर जयंत पाटील यांचा आरोप

Spread the love

‘भाजपाच्या एका माजी राज्यमंत्र्याने महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावाचा गैरवापर करुन खोटे आदेश पारीत करून १ लाख ५१ हजार ३२७ चौरस फूट जमिनीचा घोटाळा केला’, असा खळबळजनक आरोप शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी विधानसभेत पुराव्यानिशी केला. पुणे जिल्ह्यातील पाषाण गावातील सर्व्हे नंबर १३८ क्षेत्र – ७ लाख ५१ हजार ३२७ चौरस फूट जागा नामदेव धोंडीबा पाषाणकर यांच्या मालकीची होती. कुमार बिल्डर्सचे मालक ललितकुमार जैन यांनी करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र पाषाणकर यांच्याकडून लिहून घेतले आणि त्यानंतर भाजपच्या माजी राज्यमंत्र्यांबरोबर संगनमत करुन त्यांच्या सही शिक्क्याने युएलसी कायदा कलम ३४ अन्वये १३ सप्टेंबर १९९८ रोजी ही जमीन बिन अतिरिक्त घोषित केले असल्याचे आदेश प्राप्त केले. आणि त्यानंतर जैन यांनी या आदेशांवर आधारित खरेदीखत केले.

या आदेशाची प्रत जेव्हा माहिती अधिकाराच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडून मागवण्यात आली, तेव्हा असा कोणताही आदेश शासनाने पारीत केलेला नाही, तसेच अभिलेख कक्षातील रेकॉर्ड पाहता असा कोणताही आदेश अभिलेख कक्षात जमा नसल्याचे उत्तर मिळाले. त्यामुळे हा बोगस आदेश भाजपच्या एका माजी राज्यमंत्र्याने राज्यपालांच्या बनावट सही-शिक्क्याने तयार केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत केला.

वास्तविक राज्य शासनाचा प्रत्येक आदेश किंवा लेख यावर सचिव, अप्पर सचिव, सहसचिव, उपसचिव, अव्वल सचिव, सहायक सचिव किंवा त्याबाबतीत ज्यांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, अशांनी सही केली पाहिजे, असे स्पष्ट संकेत आहेत. हा आदेश खोटा असल्याचे शासनाने कबूल केले असल्याने मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षक वारजे, पोलीस ठाणे येथे पुणे येथील एका कार्यकर्त्याने माजी राज्यमंत्री, प्रकाश पाषाणकर, ललितकुमार जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. मात्र, २६ जून २०१९ रोजी वारजे पोलीस ठाण्याचे निरीक्षक खांडेकर यांनी प्राधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारीशिवाय गुन्हा दाखल करता येणार नाही, असे सांगितल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!