Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील गोपनीय अहवालात ठोस निष्कर्ष नसल्याची माहिती

Spread the love

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील गोपनीय अहवालात मूलभूत प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. डॉ. पायलने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला, ही आत्महत्या होती की हत्या अशा प्रश्नांवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने उत्तर दिलेले नाही.  डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणातील सर्व पैलूंची छाननी करून गोपनीय अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चार सदस्यीय समितीने अंतिम निष्कर्षासंदर्भात सावध पवित्रा घेतला आहे. पायलने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला, ही आत्महत्या होती की हत्या असे विविध प्रश्न समितीपुढे होते. मात्र या घटनेबाबत स्थापन झालेल्या इतर चौकशी समित्यांच्या निष्कर्षांमध्ये तफावत आल्यास संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी मूलभूत प्रश्नांवर उत्तरच टाळण्याचा पवित्रा या अहवालात घेण्यात आल्याचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने  दिले आहे.

या वृत्त नुसार डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी नायर रुग्णालयातील संबधित वैद्यकीय कर्मचारी, तज्ज्ञ तसेच विभागप्रमुख, अधिष्ठाता यांची चौकशी करण्यात आली. मात्र सरकारने स्थापन केलेल्या समितीखेरीज तडवी समाज, मागासवर्गीय समाज, महिला आयोगासह डॉक्टरांच्या संघटनांनीही चौकशी समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे सरकारने स्थापन केलेल्या समितीमधील अंतिम निष्कर्ष व पोलिसांच्या तपासातील निष्कर्षांमध्ये तफावत असल्यास संभ्रम निर्माण होऊन हा तिढा अधिक वाढेल, अशी शंका समितीतील काही सदस्यांनी चौकशीप्रक्रिया झाल्यानंतर व्यक्त केली. त्यामुळे राज्य सरकारला अहवाल सादर करताना आत्महत्या की हत्या, आत्महत्या असेल तर त्याचे कारण काय, ते टोकाच्या निर्णयासाठी पुरेसे ठरते काय, याबाबत ठोस निष्कर्ष समितीने सरकारसमोर मांडलेला नसल्याचे समजते.

नायर रुग्णालयातील विद्यार्थी, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, शस्त्रक्रिया विभागात काम करणारे सहाय्यक यांच्या चौकशीत पायल हिला तिन्ही आरोपींकडून जातीवाचक शेरेबाजी, टोमणे मारण्यात येत होते, असे निष्पन्न झाले आहे. मात्र हे कारण आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यास पुरेसे आहे का, या निष्कर्षापर्यंत समितीने कोणतेही मत अहवालात व्यक्त केलेले नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनने सत्यशोधन समिती, महिला आयोगासह तडवी डॉक्टर्स फाऊंडेशन, लोकसंघर्ष मोर्चा अशा विविध संघटनाच्या माध्यमातून हा विषय लावून धरण्यात येत आहे. सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या निष्कर्षांनंतर पोलिसांच्या तपासाला मदत होणार आहे. मात्र पोलिसांच्या तपासामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या शक्यता व या समितीच्या अहवालात तफावत आढळल्यास त्यातून गुंतागुंत अधिक वाढू शकेल, अशी शक्यता चर्चेदरम्यान समितीने व्यक्त केली.

रॅगिंगविरोधी समितीच्या अहवालानुसार, नायर रुग्णालयाचा रॅगिंगविरोधी विभाग कूचकामी असून स्त्रीरोगतज्ज्ञ विभागाचे युनिटप्रमुख चिंग लिंग यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. पायलने रॅगिंग विरोधात तक्रार करूनही त्यांनी त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ताशेरे अहवालात ओढले आहेत.

पोलिस तपासासाठी पायलच्या कुटुंबीयांना पोलिसांनी बोलावले आहे. धार्मिक विधीसाठी गावी गेलेले कुटुंबीय जळगावहून मुंबईसाठी रवाना झाले आहे. आदिवासी समाजासह तडवी डॉक्टर्स फाऊंडेशन, महिला संघटनांनीही डॉ. पायल यांच्या आत्महत्येचा तपास निष्पक्षपणे व्हावा या मागणीसाठी पायलच्या गावीही विविध प्रकारची आंदोलने सुरू असल्याचे सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!