Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नाही , राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

Spread the love

कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नसल्याचं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलंय. राष्ट्रवादीच्या आज झालेल्या मुंबईतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज पार पडली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच  या चर्चांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे सांगण्यात आले आहे .

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते, नवनिर्वाचित खासदार, उमेदवार, पदाधिकारी आणि सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. पक्षाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे, हे अस्तित्व पक्ष कायम ठेवणार. कार्यकर्त्यांनी अफवांना बळी पडता कामा नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलं.

जनता लोकसभेला वेगळा विचार करत असते आणि विधानसभेला वेगळा विचार करत असते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत लोक वेगळा विचार करतील आणि या सरकारला खाली खेचतील, असा विश्वास व्यक्त करतानाच पराभव हा पराभव असतो. पण त्याने खचून जायचं नसतं, पुन्हा लढायचं असतं, असा सल्लाही अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच राष्ट्रवादीतील नेतृत्व बदलावर कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीमुळे राष्ट्रवादीचा पराभव झाल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीने समन्स बजावल्याबाबतचा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, याबाबत प्रफुल्ल पटेलच सविस्तर उत्तरे देतील. पटेलांनी कोणतेही निर्णय वैयक्तिक घेतलेले नाहीत. याप्रकरणात सूडाचं राजकारण होऊ नये.

दरम्यान, आजच्या बैठकीत शरद पवार यांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विधानसभेच्या कामाला लागण्याचे आदेश दिल्याचं पाटील म्हणाले. अवघ्या १०० दिवसांवर विधानसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे सर्व नेते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन दौरा करतील. त्याशिवाय दुष्काळाचीही पाहणी करण्यात येणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच विधानसभेचा उमेदवार ठरविण्यात येणार आहे. तसेच तरुणांना, महिलांना आणि नव्या चेहऱ्यांना या निवडणुकीत संधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!