राज्य शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम सुषमा शिरोमणी आणि भारत जाधव यांना जाहीर

राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती तसेच दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी आणि अभिनेते भरत जाधव यांना घोषित करण्यात आला आहे, तसेच राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले आणि अभिनेते परेश रावल यांना घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी या पुरस्काराची घोषणा केली.
मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव व राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार ५ लाख रुपयाचा तर विशेष योगदान पुरस्कार ३ लाख रुपयाचा आहे.
सुषमा शिरोमणी यांनी सन १९८५ साली बालकलाकार म्हणून ‘सोने की चिडीया’, ‘लाजवंती’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. १९६९ साली ‘सतीचे वाण’ या चित्रपटात सहनायिका म्हणून तसेच ‘दाम करी काम’ या चित्रपटात मुख्य नायिका साकारली. अभिनयाच्या जोडीने चित्रपट, पटकथाकार, निर्मिती, दिग्दर्शन आणि वितरण अशा विविध भागात आपल्या कर्तृत्वाचा विलक्षण ठसा त्यांनी उमटवला आहे. १९७७ मध्ये ‘भिंगरी’ या चित्रपटाची निर्मिती केली.
राज्य शासनाच्या वतीने यंदा ५६ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया येथे दि. २६ मे २०१९ रोजी सायं.६.३० वाजता आयोजित करण्यात आला असून या सोहळयाप्रसंगी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.