Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : विदेशी प्रसारमाध्यमात वार्तांकीत झालेले नरेंद्र मोदी

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या विजयाची भारतीय मीडियाप्रमाणेच विदेशी मीडियातही चर्चा आहे. ‘भारतात हिंदू राष्ट्रवादाचं पुनरागमन,’ अशा शब्दात विदेशी मीडियाने मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या विजयाचं वर्णन केलं आहे. मात्र, मोदींच्या विजयाचं कौतुक करतानाच गेल्या पाच वर्षांतील मोदींच्या अपयशी कारभारावरही तोंडसुख घेतलं आहे. ‘राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक जिंकली,’ अशी हेडिंग ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिली आहे.

‘भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. भारतीय मतदारांनी मोदींच्या सर्वशक्तिमान आणि हिंदूत्ववादी या प्रतिमेवर शिक्कामोर्तब केलं आहे,’ असंही वाशिंग्टन पोस्टनं म्हटलं आहे. ‘भारताचे चौकीदार नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विजय,’ अशा शब्दांत ‘न्युयॉर्क टाइम्स’ने मोदींच्या विजयाचं वर्णन केलं आहे. मोदींनी स्वत:ला भारताचा चौकीदार म्हटलंय. मात्र त्यांच्या काळात अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटत होतं. उद्योगपतींना मदत करतानाच दुसरीकडे मात्र ते त्यांच्या गरिबीचेही दाखले देत होते. ते व्यापाऱ्यांसारखे बोलायचे, पण त्यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले नाहीत. हा विरोधाभास असतानाही त्यांनी हिंदू राष्ट्रवादाच्या सहाय्याने भारतात ऐतिहासिक विजय मिळविला आहे, असं न्युयॉर्क टाइम्सनं म्हटलंय.

मोदींच्या लोकप्रियतेमुळे भारतीय राजकारणाने आता हिंदू राष्ट्रवादाच्या नव्या युगात प्रवेश केला आहे. मोदींचा विजय होणं भारतासाठी वाईट गोष्ट आहे. अल्पसंख्यांकांना दुय्यम दर्जा देणाऱ्या राष्ट्रवादी नेत्याची जगाला गरज नाही, अशा शब्दात ‘द गार्डियन’ने मोदींवर टीका केली आहे. मोदींचा विजय हा धार्मिक राष्ट्रवादाचा विजय आहे. तो भारताच्या धर्मनिरपेक्ष मार्गापेक्षा वेगळा असून हिंदू राष्ट्रवादाच्या मार्गावर जाणारा आहे. ८० टक्के हिंदू भारतात राहतात. मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीयांसह इतर धर्माचे लोकही भारतात राहतात, असंही या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

मोदींनी नेत्रदीपक विजय मिळवला आहे. आता पुढची पाच वर्ष तेच पंतप्रधान राहतील. मोदींना मिळालेलं बहुमत म्हणजे त्यांच्या हिंदू राष्ट्रवादी राजकारणाला मिळालेलं बहुमत आहे, असं ‘बीबीसी वर्ल्ड’नं म्हटलं आहे. तर ‘गल्फ न्यूज’ने “TSUNAMO 2.0 SWEEPS INDIA” असं शीर्षक देऊन मोदींच्या विजयाचं वर्णन केलं आहे. दशकानंतर भाजपनं अभूतपूर्व विजय संपादन केला आहे. विरोधकांनी मोदींसमोर शेतकऱ्यांच्या समस्या, रोजगाराच्या समस्या, राफेलचा मुद्दा उपस्थित करून आव्हान निर्माण केलं होतं. मात्र पुलवामा हल्ला आणि भारताने बालाकोटमध्ये केलेल्या स्ट्राइकनंतर मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपची कथा नव्याने लिहिली, असं गल्फ न्यूजनं म्हटलं आहे.

चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने मोदींसमोर रोजगार, बँकिंग सेक्टर आणि शेतीविषय समस्यांचं आव्हान असणार असल्याचं म्हटलं आहे. तर मोदींनी साधू सारखी त्यांची प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे वैश्विक राजकारणात भारताचा दर्जा उंचावण्यात मदतच होईल. मोदींनी संसदीय निवडणुकीतील सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांची लढाई ‘पर्सनॅलिटी कल्ट’मध्ये बदलली, असं न्यूज एजन्सी ‘एपी’नं म्हटलंय. पाकिस्तानच्या ‘डॉन’नंही मोदींच्या विजयाची बातमी पहिल्या पानावर देऊन त्यावर अग्रलेखही लिहिला आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदींना दुसरा कार्यकाळ मिळाला आहे. निवडणुकीत मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी बालाकोट एअरस्ट्राइकचे कोरियोग्राफर असल्याचं ठसवत विखूरलेल्या विरोधकांवर मात केली, असं डॉननं म्हटलंय. तर पाच वर्षाच्या कार्यकाळानंतर पुन्हा पंतप्रधान होणारे मोदी हे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान असल्याचं ‘अल जजिरा’नं म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!