Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती, ममता आणि नायडू हे पंतप्रधानपदासाठी अधिक योग्य पर्याय आहेत, असं मी कधीही म्हणालो नाही : शरद पवार

Spread the love

आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे पवारांनी पुन्हा एकदा स्पष्ट करून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार असतील, असे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या केवळ २२ जागा लढत आहे. या सर्व जागा आम्ही जिंकल्या तरी बहुमताचा आकडा त्यापासून फारच दूर आहे. म्हणून माझ्यासाठी पंतप्रधानपदाचा विचारच तर्कहीन आहे, असेही पवार यांनी नमूद केले.  नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमत्री होते. त्याच धर्तीवर एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास मुख्यमंत्रिपदाचा अनुभव गाठीशी असलेले चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती हे मला पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय दिसतात, असेही पवारांनी पुढे स्पष्ट केले.

माझं मत विचाराल तर एनडीएला यावेळी स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता फारच धुसर असल्याचेही पवारांनी पुढे नमूद केले. पवार ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलत होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती, ममता आणि नायडू हे पंतप्रधानपदासाठी अधिक योग्य पर्याय आहेत, असं मी कधीही म्हणालो नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात पवारांनी स्पष्ट केले. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे राहुल गांधींनीच अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर कोणतीही चर्चा निरर्थक ठरते, अशी पुस्तीही पवारांनी पुढे जोडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!