Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण; 7 लोकसभा मतदार संघात होत आहे 11 एप्रिलला मतदान

Spread the love

लोकसभा निवडणूक अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान दि. 11 एप्रिल 2019 रोजी होत असून त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अतिदुर्गम भागातील 35 मतदान केंद्रांसाठी निवडणूक कर्मचारी आज रवाना करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपला. आता गुरुवारी ११ एप्रिलला देशभरात लोकसभेच्या ९१ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातल्या विदर्भातील सात जागांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामध्ये वर्धा मतदार संघात 14 उमेदवार निवडणूक लढवत असून रामटेक- 16,नागपूर – 30, भंडारा- गोंदिया – 14, गडचिरोली- चिमूर – 5, चंद्रपूर – 13 आणि यवतमाळ-वाशिम मतदार संघात 24 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मनुष्यबळाची नेमणूक तसेच पोलीस बंदोबस्त व अन्य सुरक्षा बलांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिदुर्गम भागात मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व सुरक्षा यंत्रणेची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे.

लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ९१ जागांसाठी गुरुवारी मतदान होईल. २० राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशात हे मतदान पार पडेल. बहुतेक सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेदरम्यान मतदान होईल. ईशान्येतील नक्षलग्रस्त राज्यांमधील लोकसभेच्या काही जागांवर सकाळी ७ ते संध्याकाळी ५, काही ठिकाणी सकाळी ७ ते दुपारी ४ आणि सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणामुळे मतदानाचा कालावधी मर्यादित ठेवण्यात आला आहे.

97 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 30 कोटी रुपयांची रोकड…

राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून आतापर्यंत 97 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 30 कोटी रुपयांची रोकड, 17 कोटी रुपयांची दारु, 4.61 कोटी रुपयांचे मादक पदार्थ, 44 कोटी  रुपयांचे  सोने, चांदी व इतर मौल्यवान जवाहीर यांचा  समावेश आहे.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सी-व्हिजिल ॲपचा राज्यभरात नागरिक प्रभावी उपयोग करीत असून आतापर्यंत 2हजार 527 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 1 हजार 497 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून चौकशीअंती आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. सी-व्हिजिल ॲपवर अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारुचे वाटप,पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघात २४९ उमेदवार निवडणूक लढविणार

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील चौदा मतदार संघामध्ये एकूण 249 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख दि. 8 एप्रिल ही होती. अंतिम यादीत 249 उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत. अंतिम यादीतील उमेदवारांची मतदारसंघनिहाय संख्या पुढील प्रमाणे जळगाव (14), रावेर (12), जालना (20), औरंगाबाद (23), रायगड (16),पुणे (31), बारामती (18), अहमदनगर (19),माढा (31), सांगली (12), सातारा (9), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (12), कोल्हापूर (15), हातकणंगले (17). तिसऱ्या टप्प्यात दि. 23 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!