अखेर काँग्रेसच्या जिलाध्यक्षपदाचा राजीनामा देत, अब्दुल सत्तार यांचा सुभाष झांबड यांच्या विरोधात बंडाचा झेंडा रोवण्याचा निर्धार !!

औरंगाबाद येथून सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज झालेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन औरंगाबादमधून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे अखेर जाहीर करीत बंडाचा झेंडा उभा केला असल्याने काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्यासमोर आणि पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नाराजीचा व्हिडीओ सुद्धाव्हायरल झाला असल्याने काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.
अब्दुल सत्तार आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले कि , लोकसभा निवडणुसाठी मागील अनेक महिन्यांपासून मी तयारी करत होतो. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी गावोगावी फिरलो , एल्गार यात्रा काढली, कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले इतके करुनही पक्षाने मला डावलले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत मी लढवणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
दरम्यानच्या काळात अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसमध्ये येऊन रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढावी म्हणून अब्दुल सत्तार प्रयत्नशील होते. तसेच औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसमधून आणून तिकीट द्यावी यासाठीसुद्धा सत्तार यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे आग्रह धरला होता. मात्र अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश न मिळाल्याने अब्दुल सत्तार निराश झाले आहेत . काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र चलबिचल चालूआहे.