Aurangabad Loksaha : सुभाष झांबड यांच्या उमेदवारीने जिल्हाध्यक्ष झाले नाराज , पक्षांतर्गत बंडाळीची चिन्हे !!

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी सर्वत्र पोहोचत नाही तोच त्यांच्या उमेदवारीला विरोध करत काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे . अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या नजीकचे मानले जातात पर्यायाने या दोघांच्याही मताला डावलून झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्त आहे . दरम्यान पक्षांतर्गत बंडाळी निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून काँग्रेस पक्षांतर्गत पहिल्यांदाच अशी लोकशाही दिसत आहे कि , पक्ष श्रेष्टींनीं घेतलेल्या निर्णयाविरुद्ध पक्षाचे पदाधिकारी जाताना दिसत आहेत. जालना मतदारसंघातुन त्यांनी स्वतः किंवा डॉ. कल्याण काळे लढतील असे स्पष्ट केले होते.
एकीकडे जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची हि अवस्था असून दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण सुद्धा आपले पक्षात कोणी ऐकत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या पक्षाच्या राजकीय लढाईबद्दल प्रश्नचिंन्ह निर्माण झाले आहे. वास्तविक आमदार अब्दुल सत्तर व्यक्तिशः सुभाष झांबड यांना उमेदवारी मिळावी यासाठी फारसे उत्सुक नव्हते हे अनेक प्रसंगातून दिसून आले आहे. त्यांनी नेहमी दुसऱ्या उमेदवारांची नावे सुचविली परंतु सुभाष झांबड यांचे नाव कधीही घेतले नाही, जेंव्हा कि, गेल्या वर्षभरापासून झांबड लोकसभेची तयारी करीत आहेत. आमदार सुभाष झांबड हे विधान परिषदेतील आमदार असून त्यांच्या आमदारकीची मुदत येत्या ऑगस्टमध्ये संपत आहे. औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून रवींद्र बनसोड सुद्धा प्रयत्नात होते तर हि जागा राष्ट्रवादीला मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाणसुद्धा प्रयत्नशील होते परंतु काँग्रेसने रात्री उशिरा झांबड यांना उमेदवारी देत या प्रकरणावर पडदा टाकला.
काँग्रेसने शुक्रवारी उशिरा जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत औरंगाबादेतून आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी मिळाल्याचे वृत्त येताच आमदार अब्दुल सत्तार नाराज झाले असल्याची चर्चा आहे. झांबड यांच्या उमेदवारीबाबत आपल्याला विश्वासात घेतला नसल्याचा सत्तार यांचा दावा आहे. अब्दुल सत्तार हे औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. झांबड आणि सत्तार यांच्यातला उभा वाद आता विकोपाला पोहोचला आहे. दरम्यान, औरंगाबादेतल्या या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही इच्छुक होती. राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण यांनाही उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू होते. पण काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार देत हि जागा सुभाष झांबड यांना जाहीर करण्यात आली आहे .