मोदींच्या बायोपिकवर बंदी घालण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

लोकसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर आठवडाभराच्या आतच मोदींच्या बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली. मात्र आता प्रदर्शनाच्या तारखेवरून वाद सुरू झाला असून या चित्रपटावर निवडणुकांच्या काळात बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
गोव्यातील काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेनं ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकवर बंदी घालण्याची मागणी निवडणूक आगोयाकडे केली असल्याची माहिती ‘द रिपब्लिक’ वृत्तवाहिनीनं दिली आहे.. या चित्रपटात भाजपाचा छुपा अजेंडा लपला असून मतं मिळवण्यासाठी या चित्रपटाचा वापर केला जात असल्याचा आरोप ‘द नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया’ (NSUI) नं केला आहे.
गेल्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. सात टप्प्यात ११ एप्रिल ते १९ मे या दरम्यान मतदान होणार आहे. या तारखा जाहीर झाल्यानंतर आठवडाभराच्या आत मोदींचा बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. १२ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोदींना अपयश आलं आहे आता अपयश लपवण्यासाठी अधिकाधिक मतदारांना प्रभावित करून जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी या चित्रपटाचा वापर केला जात आहे असा आरोप NSUI नं केला आहे/
ज्या मतदार संघातून मोदी निवडणूक लढवतील त्या राज्यात या चित्रपटावर पूर्णपणे बंदी घालवी अशी मागणी NSUI केली आहे. या स्वरूपाचं पत्र निवडणूक आयोगाला पाठवून त्यांनी बंदीची मागणी केली आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत आहे.