Jamuu & Kashmir : आयएएस टॉपर डॉ. शाह फैजल राजकीय आखाड्यात

काश्मिरींवर अन्याय होत असल्याचा आरोप करत भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा देणारे जम्मू- काश्मीरमधील माजी आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल हे राजकीय आखाड्यात उतरले आहेत. श्रीनगरच्या जाहीर सभेत त्यांनी जम्मू अॅण्ड काश्मीर पिपल्स मुव्हमेंट या पक्षाची घोषणा केली. त्यांच्या या सभेत काश्मीर खोऱ्यातील शेकडो लोक सहभागी झाले होते. विशेषतः तरुणांची संख्या लक्षणीय होती. लेह आणि जम्मूमधील प्रतिनिधीही या सभेला उपस्थित होते.
२०१०च्या आयएएस बॅचचे टॉपर असलेले डॉ. फैजल यांनी यावर्षी जानेवारीत भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता. काश्मिरींवरील अन्याय आणि भारतीय मुस्लिमांची उपेक्षा होत असल्याचा आरोप करत त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर फैजल यांनी राजकारणातील प्रवेशाचं मुख्य कारण सांगितलं. पारंपरिक किंवा प्रादेशिक राजकारण करण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. शांततेच्या मार्गानं काश्मीर प्रश्न सोडवण्याचं काम, तसंच जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचं काम माझा पक्ष करणार आहे, असं फैजल यांनी सांगितलं.
काश्मीर खोऱ्यातून स्थलांतरीत झालेले काश्मिरी पंडीत हे राज्याच्या संस्कृतीचा एक भाग असून, त्यांना सन्मानानं परत आणण्याचं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वकील, डॉक्टर, व्यावसायिक आणि जेएनयूच्या माजी विद्यार्थी नेत्या शेहला रशिद शोरा आणि फिरोज पीरजादा यांनीही या पक्षात प्रवेश केला. खूप विचार केल्यानंतर या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. निवडणूक लढवायची की नाही, हे अद्याप ठरवलेले नाही, असे शेहला यांनी सांगितले. दुसरीकडे फैजल यांच्या पक्षाच्या नावाला फुटीरतावादी नेत्यांनी आक्षेप घेतला. फैजल यांच्या पक्षाचं नाव बदलावं अशी मागणी त्यांनी केली.