ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा देशाचे संरक्षण खात्यावर गंभीर प्रहार

देशात सर्वत्र भ्रष्टाचार आहे, मात्र आपले संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट आहे. राफेल विमानखरेदीतील संशयास्पद व्यवहारांवरून ही बाब अधोरेखित होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी ‘मुंबई कलेक्टिव्ह’च्या परिसंवादात व्यक्त केले. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रविवारी झालेल्या परिसंवादाची सुरुवात ‘राफेल: मोदीज नेमेसिस?’ या विषयाने झाली. या विषयावर राफेल प्रकरणाबाबतची स्फोटक माहिती राम यांनी दिली.
‘सरकारने युरो फायटरसारखे चांगले पर्याय असताना राफेलची निवड करण्यात आली. ‘दसॉल्त’शी करार करताना समांतर वाटाघाटी केल्या गेल्या. एवढेच नव्हे तर या करारातील भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदी जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आल्या. रशिया, अमेरिका यांच्याशी केलेल्या करारांमध्ये अशा तरतुदी नाहीत हे खरे असले तरी ते त्या देशांच्या सरकारांशी केलेले करार असल्याने त्यात तशी गरज नव्हती. मात्र राफेलमध्ये सरकारचा व्यवहार एका खासगी कंपनीशी होत होता. अशा वेळी या तरतुदी काढण्याचे प्रयोजन काय? या आणि अशा अनेक संशयास्पद बाबींमुळे राफेल खरेदी प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी येते, असे राम म्हणाले.
अटॅक ऑन कॉन्स्टिटय़ूशन डेमॉक्रसी, सोशल मीडिया अँड सबव्हर्जन ऑफ डेमॉक्रसी, मिसिंग जॉब्ज, मिसलीडिंग स्टॅटिस्टिक्स, लेट्स टॉक अबाऊट सेक्युलॅरिझम, हिंदूइझिंग इंडियन डेमॉक्रसी अशा विषयांवर आयोजित परिसंवादात वक्त्यांनी संविधान महत्त्वाचे असून संविधानापेक्षा कुठलाही धर्म मोठा नाही. धर्म हा प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे, असे मत मांडले. ‘व्हॉट्सअॅप आणि राष्ट्रवाद’ या विषयावर इतिहासकार एस. इरफान हबीब म्हणाले, की समाजमाध्यमांवर कोणी तरी उपटसुंभ लोक स्वत:च खोटा इतिहास लिहून तो प्रसारित करतात. असे लोक इतरांना भूतकाळातच रमवण्यात यशस्वी होत आहेत. आपण भूतकाळात न रमता वर्तमान आणि भविष्यकाळाचा विचार केला पाहिजे.