Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राफेल करारासंबंधीची कागदपत्रं चोरीला गेली असे बोललोच नाही : के. के. वेणुगोपाल

Spread the love

राफेल करारासंबंधीची कागदपत्र चोरीला गेल्यावरून विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. अशात आता महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी नवा दावा केला आहे. संरक्षण मंत्रालयातून राफेल करारासंबंधीचे दस्तावेज चोरीला गेले नाहीत असे आता के. के. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. बुधवारी महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले होते की राफेल करारासंबंधीची महत्त्वाची कागदपत्रं हरवली आहेत. हे वक्तव्य समोर आल्यापासून विरोधकांनी सरकारवर टीकेची आगपाखड केली होती. मात्र आता याचिकाकर्त्यांनी सदर कागदपत्रांच्या फोटोकॉपी कोर्टात सादर केल्या. ही कागदपत्रं हरवलेली नाहीत असा नवा दावा के. के. वेणुगोपाल यांनी केला.

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी दरम्यान मला अशी माहिती मिळाली होती की राफेल करारासंबंधीची कागदपत्रं चोरीला गेली. मात्र वास्तव वेगळं आहे, मी यासंबंधीची माहिती दिलीच नाही व कागदपत्रं चोरीला गेल्याचे बोललो नाही असे आता वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

संरक्षण मंत्रालयातून जी कागदपत्रे सार्वजनिक झाली ती चोरीला गेल्यामुळे नाही तर मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढण्यात आल्याने झाली. ही कागदपत्रं गोपनीय असतात मात्र ती सार्वजनिक झाली. राफेल करारासंबंधी जो निर्णय देण्यात आला त्याविरोधात प्रशांत भूषण आणि यशवंत सिन्हा यांनी जी याचिका दाखल केली होती त्यामध्ये फोटोकॉपीजचा समावेश होता. आपण हेच बोललो होतो असे आता वेणुगोपाल म्हणत आहेत. त्यामुळे कागदपत्रे चोरी झाली की लीक झाली हा नवा प्रश्न समोर येतो आहे.

राफेल कराराविरोधातील बातम्यांनी राजकीय वर्तुळात भूकंप घडत असतानाच, या कराराची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली आहेत, असा धक्कादायक दावा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात बुधवारी केला. तसेच ‘हिंदू’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या या त्याच कागदपत्रांवर आधारित असून हा गोपनीयता कायद्याचा भंग आहे, असाही पवित्रा सरकारने घेतला आहे. काँग्रेसने यावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली असून भ्रष्टाचारच नव्हे, तर दुराचारही उघड झाल्याचा आरोप केला. मात्र के. के वेणुगोपाल यांनी आता ही कागदपत्रं चोरीला गेलीच नाहीत असे म्हटले आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!