Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : गुंठेवारी प्रक्रियेतून महापालिकेला २० कोटीहून अधिक उत्पन्न

Spread the love

औरंगाबाद : शहरातील गुंठेवारी नियमितीकरण न करणाऱ्या नागरिकांच्या मालमत्ता पाडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जरी केल्यामुळे गुंठेवारीतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यावरून आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला होता. दरम्यान नागरिकांची अडचण लक्षात घेता राज्य शासनाने नियमितीकरण प्रक्रियेस पुन्हा एकदा सुरुवात केल्याने नागरिकाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. या प्रक्रियेत पालिकेला दोन महिन्यांत २० कोटी ६३ लाखांचे उत्पन्न मिळाले असून त्यापैकी एकट्या सातारा-देवळाई भागातून वसुली झाली आहे.


औरंगाबाद शहरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा केल्यानंतर औरंगाबादमध्ये गुंठेवारी भागातील मालमत्ता नियमित करून घेण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. हे प्रमाण वाढावे, यासाठी महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयात व मुख्यालयात गुंठेवारीचा स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मालमत्ता नियमित करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी ५२ आर्किटेक्टच्या एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून सादर झालेले परिपूर्ण प्रस्ताव पालिकेच्या नगररचना विभागाकडून मंजूर केले जात आहेत. प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी संबंधित मालमत्ताधारकाकडून शुल्क भरून घेतले जात आहे.

पालिकाचे गुंठेवारी कक्षप्रमुख संजय चामले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांत २,२०० प्रस्तावाच्या फाइल दाखल झाल्या आहेत. या प्रस्तावांच्या माध्यमातून २० कोटी ६३ लाख ५८ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेल्या महसूलात मोठा वाटा सातारा-देवळाई भागातील नागरिकांचा आहे. या भागातून गुंठेवारी नियमितीकरणांतर्गत आतापर्यंत नऊ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. सातारा-देवळाई खालोखाल गारखेडा भागातून तीन कोटी १३ लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला प्राप्त झाले आहे. हर्सुल जटवाडा भागातून दोन कोटी ८१ लाख रुपये पालिकेला आतापर्यंत मिळाले आहेत. गुंठेवारी नियमितीकरणातून मिळणाऱ्या शुल्कासाठी पालिकेने आता बँकेत स्वतंत्र खाते उघडले आहे; शिवाय एचडीएफसी बँकेच्या शहरातील सर्व शाखांत शुल्क भरण्याची व्यवस्थाही केली आहे.

Click to listen highlighted text!