Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित जसराज निवर्तले

Spread the love

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं अमेरिकेतील न्यूजर्सी येथे निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. मेवाती घराण्याचे पंडित जसराज यांचं सुरुवातीचं शिक्षण वडील पंडित मोतीराम यांच्याकडे झालं. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी गायक म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. तर २२ व्या वर्षी गायक म्हणून त्यांनी पहिला स्टेज शो केला. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी , काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. पंडित जसराज यांनी भारतीय संगीतासाठी आपले  संपूर्ण जीवन अर्पण केले होते. भारतीय संगीत आणि पंडित जसराज यांचा जणू संगमच झाला होता.

याबाबत माहिती देताना त्याच्या कन्या दुर्गा जसराज म्हणाल्या की, ‘अतीशय जड अंतःकरणाने सांगावं लागत आहे की, पंडित जसराज यांचं अमेरिकेतील न्यूजर्सी येथे सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं.’ त्या पुढे म्हणाल्या की, ‘आम्ही प्रार्थना करतो की भगवान श्रीकृष्ण त्यांचं प्रेमाने स्वर्गात स्वागत करेल. तिथे आता पंडितजी ओम नमो भगवते वासुदेवय हे गाणं फक्त त्यांच्या प्रिय देवासाठी गातील. आम्ही प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास नेमही संगीतमय शांती मिळो.’

पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० झाला होता. त्यांना संगीताचा  चार पिढ्यांपासूनचा वारसा होता. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा मोठा भाऊ पंडित मणिराम यांनीच  जसराज यांचा सांभाळ केला होता. हरियाणातील हिसार येथील जसराज यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची कन्या  मधुरा शांताराम यांच्याशी विवाह केला होता. १९६० च्या सुमारास मधुरा आणि जसराज यांची ओळख मुंबई येथे झाली होती.

‘पंडित जसराज यांचे वडील मोतीराम हेसुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. पंडितजींना आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला. संघर्ष, मेहनत आणि रियाझ यातून भारतीय संगीत सृष्टीला त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. आपल्या गायनातून श्रोत्यांना  आणि  देश-विदेशातल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारे पंडितजी हे संगीत क्षेत्रातले गान गुरु होते. शास्त्रीय गायनासाठी त्यांना आजपर्यंत अनेक सन्मान, पुरस्कार मिळाले असून केंद्र शासनाने पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!