Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jalna News Update : जालन्याच्या औद्योगिक वसाहतीमधील स्फोट : जळून कोळसा झालेल्या मृतांची ओळख पटली, तर “हे ” सहा कामगार भाजले…

Spread the love

जालना येथील औद्योगिक वसाहतीत आज सायंकाळी ओम साईराम या स्टील कंपनीत भट्टीतील तप्त लोखंडाचा उकळता रस क्रेनद्वारे वाहून नेण्याची प्रक्रिया चालू असताना अचानक हा तप्त लोखंडाचा रस अंगावर पडून झालेल्या भीषण अपघातात पाच कामगारांचा जागीच कोळसा झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. या स्फोटातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्याचे  काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास साईराम स्टीलस् कंपनीत हा अपघात झाला. दरम्यान या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत  कंपनीच्या मालकाचे नाव व गाव माहीत नसल्याचे नमूद करण्यात आले असले तरी पोलिसांनी जवाहर शंकरलाल डेमडा (रा. गोपीकिशन नगर जालना), सुनील सिंग (रा. बजाजनगर, जालना) व प्रतीक रमेश गोहेल (रा. व्यंकटेश नगर, जालना) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालन्यातील भारूका परिवाराची ही कंपनी असून, अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे औद्योगिक वसाहत परिसरात खळबळ उडाली आहे. मृत पावलेले सगळे कामगार उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृतांमध्ये १. रामहित सिंग, २. भरत रामदेव पंडित, ३. अजय कुमार, ४. अंकुर कुमार आणि  ५. राजा सिंग यांचा समावेश असून . जखमींमध्ये १. मोहंमद मुज्जेमिल, २. प्रदीप यादव, ३. प्रदीप रॉय, ४. राकेश पाल, ५. अनिल कुमार आणि ६. संजीव कुमार यांचा समावेश आहे. या प्रकरणात चंदनझिरा पोलिस ठाण्यामध्ये अनिल कुमार नंदुराम (रा. खटंगा सिकंदरापूर, जि. बलिया, उत्तर प्रदेश व ह. मु. गायत्री स्टीलस् लेबर क्वार्टर जालना) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ओम साईराम कंपनीच्या मालकाविरोधात तक्रार देण्यात आली आहे.त्यावरून  पोलिसांनी भादवि ३०४ (अ), ३३७, ३३८, २८७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  जवाहर शंकरलाल डेमडा (रा. गोपीकिशन नगर जालना), सुनील सिंग (रा. बजाज नगर, जालना) व प्रतीक रमेश गोहेल (रा. व्यंकटेश नगर, जालना) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या जाळीत प्रकरणाचे वृत्त समजताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती परंतु पोलिसांनी मदत कार्यात अडथळे येऊ नयेत म्हणून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बघ्यांबरोबरच माध्यमांच्या प्रतिनिधीनाही घटनास्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.  घटनेचे  गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे  सांगितले. या अपघातातील जखमी कामगारांवर जालना आणि औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून चंदनझिरा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , जालन्यातील लोखंडी सळ्या तयार करणाऱ्या या कारखान्यात झालेला हा स्फोट प्रचंड मोठा होता. स्फोटानंतर कारखान्यात लगेचच आग लागली आणि संपूर्ण कारखाना आगीच्या विळख्यात सापडला. यावेळी अनेक कामगार कारखान्यात काम करत होते. अचानक झालेला स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीमुळे या कामगारांना कारखान्यातून बाहेर पडणे  अशक्य झाले. त्यामुळे या आगीत पाच  कामगारांचा होरपळून कोळसा झाला, तर अनेक कामगार गंभीररीत्या भाजले  गेले. जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे  सांगण्यात येत आहे. या स्फोटाचे आवाज दूरपर्यंत ऐकायला आल्याचे  प्रत्यक्षदर्शींनी  सांगितले . स्फोट झाल्यानंतर कंपनीत एकच धावपळ उडाली होती. काही कामगारांच्या आरोळ्याही ऐकायला येत होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!