Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ईडी आणि सीबीआयची चौकशीचा धाक दाखवून पक्षांतरासाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव : शरद पवार

Spread the love

तपास यंत्रणांचा धाक दाखवून सत्ताधारी इतर पक्षांमधील नेत्यांना पक्षांतरासाठी  धमकावत आहेत आणि सत्तांतरे घडवून अनंत आहेत. हे सूड आणि दबावाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: आमदारांना फोन करत असल्याचा थेट आरोपही पवार यांनी केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे सरकार ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर नेत्यांना धमकावण्यासाठी करत आहे असे म्हणत चित्रा वाघ आणि हसन मुश्रीफ यांनाही सत्ताधाऱ्यांनी पक्षांतरासाठी धमकावले असल्याचा थेट आरोप पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. तसेच हसन मुश्रीम यांनी भारतीय जनता पक्षात जाण्यास नकार दिल्यानेच त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आल्याचेही पवार म्हणाले. ईडी आणि सीबीआयची चौकशी मागे लागल्यानेच नेत्यांना पक्षांतर करावे लागत असल्याचे ते म्हणाले.

‘राज्याचे प्रमुख आणि त्यांचे मंत्रिमंडळातील काही सहकारी विरोधी पक्षांतील नेत्यांशी संपर्क साधत असून, त्यांना सत्ताधारी पक्षात येण्यासाठी आग्रह धरला जात आहे. पक्षांतरबंदीबाबत संसद आणि विधिमंडळाने केलेले कायदे धुळीला मिळविले जात आहेत. पक्षात येण्यास नकार देणाऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले जात असून, त्यातून सोडविण्याच्या अटीवर पक्षांतर करून घेतले जात आहे. तपास यंत्रणांना हाताशी धरून लोकप्रतिनिधींवर दडपण आणले जात आहे. राज्यातच काय पण देशताही अशा पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर कोणीच केला नव्हता’, असे टीकास्त्र पवार यांनी सोडले.

सत्ताधाऱ्यांनी काही नेत्यांना केवळ धमकावण्याच्या कामाची जबाबदारी दिलेली आहे. हे सत्ताधारी इतरांना धमकावण्याचे काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: आमदारांना फोन करत असल्याचा थेट आरोपही यावेळी पवार यांनी केला. लोकसभेप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करून लढणार असून, आत्तापर्यंत झालेल्या चर्चेत दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी १२०-१२० अशा २४० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित ४८ जागा स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे गट) यासारख्या समविचारी पक्षांना दिल्या जातील. पुढील काळात या जागांवरील उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याचे संकेत पवार यांनी दिले.  गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असला, तरी विद्यमान राज्यकर्त्यांना दुष्काळाचे गांभीर्यच समजलेले नाही, असा आरोप पवार यांनी केला. दुष्काळावरील उपाययोजनांबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आले नाही. त्यामुळे, सत्तेतील सहभागी शिवसेनेसारख्या पक्षालाही नाराजी व्यक्त करून आंदोलन करावे लागले, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!