Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup 2019 : इंग्लंडची अफगाणिस्तानवर तब्बल १५० धावांनी मात

Spread the love

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान इंग्लंडने अफगाणिस्तानवर तब्बल १५० धावांनी मात करत गुणतालिकेत प्रथम स्थानी झेप घेतली आहे. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या ३९८ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ  ५० षटकांत २४७ धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याला सामनावीर घोषित करण्यात आले. इंग्लंडने दिलेल्या बलाढ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात अत्यन्त खराब झाली.

सलामीवीर नूर अली झारदान शून्यावर बाद झाला. यानंतर आलेल्या रहमत शाह याने सलामीवीर गुलबदीन नायब याच्यासह संयमित खेळ करत अफगाणिस्तानचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तानचा संघ टिकाव धरू शकला नाही. रहमत शाह (४६), हशमतुल्लाह शाहिदी (७६) आणि असघर अफगाण (४४) यांचा अपवाद वगळता अफगाणिस्तानचे फलंदाज खेळपट्टीवर जम बसवू शकले नाहीत आणि नियमित अंतराने बाद झाले. निर्धारित ५० षटकांत अफगाणिस्तान ८ गड्यांच्या मोबदल्यात २४७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी ३, तर मार्क वूड याने २ गडी बाद केले.

दरम्यान, सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रो, इऑन मॉर्गन, आणि जो रुट यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी ३९८ धावांचा डोंगर उभा केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंडच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. इंग्लंडची सुरुवात संयमित झाली. सलामीवीर जेम्स विन्स ४४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या जो रुटने जॉनी बेअरस्ट्रोसोबत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १२० धावांची भागिदारी केली. मात्र, गुलबदीन नायब याने जॉनी बेअरस्ट्रोला (९०) बाद करत संघाला दुसरे यश मिळवून दिले.

बेअरस्ट्रो बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या इऑन मॉर्गनने तडाखेबाज फलंदाजी करत ७१ चेंडून १४८ धावांची खेळी साकारत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मॉर्गनच्या या खेळीत ४ चौकार आणि तब्बल १७ षटकारांचा समावेश होता. जो रुटने त्याला योग्य साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १८९ धावांची भागिदारी रचत इंग्लंडला मोठ्या धावसंख्येकडे नेले. गुलबदीन नायबने जो रुटला बाद केले. तो ८८ धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेले बेन स्टॉक्स, जॉस बटरल झटपट बाद झाले. मोईन अलीने शेपटाचा तडाखा देत ९ चेंडूत ३१ धावांची खेळी करत निर्धारित ५० षटकांत इंग्लंडला ६ गड्यांच्या मोबदल्यात ३९७ धावांचा मोठा टप्पा गाठून दिला. अफगाणिस्तानकडून गुलबदीन नायब आणि दौलत झादरान यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!