Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून आठ तास चौकशी

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांची आठ तास कसून चौकशी करण्यात आली. काही वेळापूर्वीच त्यांनी ईडीचे कार्यालय सोडले आहे. उद्या पुन्हा एकदा त्यांचे म्हणणे पूर्ण करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं आहे. उद्याही ते ईडीपुढे हजर राहून त्यांचे म्हणणे मांडतील. १० आणि ११ जून रोजी ईडीने (अंमलबजावणी संचलनालय) प्रफुल्ल पटेल यांना हजर रहाण्यासंदर्भात समन्स बजावले होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या हवाई वाहतूक घोटाळ्याप्रकरणी एअर इंडिया संबंधित प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले. याच घोटाळ्या संदर्भात पटेल यांची आठ तास कसून चौकशी करण्यात आली.

याआधी मागच्या आठवड्यातही प्रफुल्ल पटेल यांना ईडीने समन्स बजावले होते आणि गेल्या गुरूवारीच चौकशीसाठी हजर रहाण्यास सांगितले होते. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगत पटेल यांनी गुरूवारी हजर रहाणे टाळले. त्यानंतर त्यांना शनिवारी दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले. आता आज ते ईडीपुढे हजर होते. तिथे त्यांची आठ तास कसून चौकशी करण्यात आली.

काय आहे हे प्रकरण?
हवाई वाहतूक क्षेत्रातील दलाल (लॉबिस्ट) दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक झाली होती. तलवारने त्याचे संपर्क वापरून खासगी विमान कंपन्यांसाठी अनेक फायदे लाटले. एमिरेट्स, एअर अरेबिया आणि एअर कतार यांच्यासाठी लॉबिंग करण्याकरिता व त्यांचा बेसुमार फायदा करून देण्यासाठी तलवारने राजकीय नेते, मंत्री व इतर सरकारी नोकर आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी यांच्याशी संधान साधले, असाही ईडीचा आरोप आहे.

दीपक तलवारने २००८-०९ या काळात एअर इंडियाचे नुकसान करून या खासगी विमान कंपन्यांसाठी अनुकूल असे वाहतुकीचे हक्क मिळवून दिल्याचा दावा ईडीने केला आहे. मोबदल्यात, या कंपन्यांनी तलवार याला २७२ कोटी रुपये दिले असेही नंतर उघड झाले. या आधारे ईडीने दीपक तलवारविरोधात आरोपपत्र दाखल केले. तलवार हा पटेल यांच्या नियमितपणे संपर्कात होता, असे त्यात म्हटले होते. अटक करण्यात आलेल्या तलवारने एमिरेट्स आणि एअर अरेबियाच्या वतीने प्रफुल्ल पटेल यांना संबोधित केलेल्या अनेक पत्रांना अंतिम रूप दिले, असाही दावा ईडीने आरोपपत्रात केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!