मोशी कचरा दुर्घटना : ५५ तास उलटले तरी ८ कामगार बेपत्ता; संतप्त नातेवाईकांचा प्रशासनाला जाब
मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत पडल्याच्या भीषण दुर्घटनेला तब्बल ५५ तास उलटूनही बचावकार्य सुरूच असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ कामगारांचा अद्यापही शोध लागलेला नाही. संथ गतीने सुरू असलेल्या बचावकार्यातून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत घटनास्थळी आक्रोश केला.
दुर्घटनेत महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, सुनील कोरके, अक्षय सावंत, रणजित पाटील, नागेश गायकवाड आणि वामन कसबे हे आठ जण अजूनही बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून सलग तिसऱ्या दिवशीही प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली असून, प्रत्येक क्षणागणिक त्यांची चिंता वाढत आहे.
नातेवाईकांचा संताप; ‘आमचा माणूस आम्हाला पाहू द्या’
संतप्त नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत, “तीन दिवसांपासून कचऱ्याचा ढिगारा तसाच आहे. गेल्या ३३ तासांत एकाही व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आलेले नाही. फक्त बचावकार्य सुरू असल्याचे सांगितले जात आहे,” अशी नाराजी व्यक्त केली. “आमचा माणूस आम्हाला पाहू द्या,” अशी भावनिक विनंतीही त्यांनी प्रशासनाला केली.
दरम्यान, महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाईकांना धीर दिला. बचावकार्य पूर्ण क्षमतेने सुरू असून, अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला बचावकार्य अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
यावेळी महापौर रवी लांडगे, आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
बायोमायनिंगला गती देण्याचे निर्देश
मोशीतील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच दररोज प्रक्रिया न होणाऱ्या सुमारे १०० टन कचऱ्यावर स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या.
प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा
माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी दुर्घटनास्थळी भेट देत या दुर्घटनेसाठी ठेकेदाराला जबाबदार धरले. “कचरा डेपो परिसरात इमारत उभारण्यास परवानगीच देता कामा नये. राज्यात विरोधी पक्ष जिवंत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक गंभीर
पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा १९९१ पासून मोशी डेपोमध्ये टाकला जात आहे. डेपोची क्षमता संपल्यानंतर पुनावळे येथे नवीन कचरा डेपो उभारण्याची योजना होती. मात्र स्थानिक विरोधामुळे ते आरक्षण रद्द करण्यात आले. त्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आणखी गंभीर बनला असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.
छ.संभाजीनगरात खळबळ! ‘डॉन’च्या बंगल्यावर गुन्हे शाखेची धाड; साडेपाच कोटींची रोकड जप्त
Moshi Garbage Depot Accident, Moshi Building Collapse, Moshi Garbage Dump News, Pimpri Chinchwad Accident, Pune Breaking News, Rescue Operation Moshi, Maharashtra Breaking News, Garbage Mountain Collapse, Moshi Latest News, Marathi News
