Greece : विमानाच्या खिडकीची काच फुटली अन् प्रवासी बाहेर खेचला गेला; सीटबेल्टने वाचवला जीव
ग्रीसमधून जर्मनीकडे जाणाऱ्या रायनएअरच्या विमानात उड्डाणादरम्यान घडलेल्या थरारक घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विमान हजारो फूट उंचीवर असताना इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्याचा एक तुकडा विमानाच्या खिडकीवर आदळल्याने काच फुटली. अचानक झालेल्या हवेच्या दाबातील बदलामुळे खिडकीजवळ बसलेला प्रवासी बाहेर खेचला जाऊ लागला. सुदैवाने सीटबेल्ट बांधलेला असल्याने मोठा अनर्थ टळला.
माहितीनुसार, रायनएअरचे FR 1879 हे विमान ग्रीसमधील मॅसेडोनिया विमानतळावरून जर्मनीकडे निघाले होते. विमान उत्तर मॅसेडोनियाच्या हवाई हद्दीत असताना इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. इंजिनचा एक तुकडा वेगाने उडून विमानाच्या मुख्य भागावर आदळला आणि एका खिडकीची काच फुटली.
काच फुटताच विमानातील हवेचा दाब अचानक कमी झाला. खिडकीजवळ बसलेले 61 वर्षीय सर्बियन पर्यटक दाबामुळे बाहेर खेचले जाऊ लागले. त्यांचे डोके आणि खांदे विमानाबाहेर गेले होते. मात्र त्यांनी सीटबेल्ट लावलेला असल्यामुळे ते पूर्णपणे बाहेर फेकले गेले नाहीत. त्यांच्या पत्नीने प्रसंगावधान राखत त्यांचे पाय घट्ट पकडले, तर इतर प्रवाशांनीही मदतीसाठी धाव घेत त्यांना पुन्हा आत ओढले.
घटनेनंतर पायलटने तात्काळ विमान मागे वळवून अवघ्या 20 मिनिटांत थेसालोनिकी विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केले. या घटनेत संबंधित प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नसली तरी त्यांच्या शरीरावर अनेक ओरखडे आले आहेत. तसेच भीतीमुळे काही प्रवाशांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले.
या घटनेनंतर विमानाच्या इंजिनातील बिघाड आणि खिडकी फुटण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.
Ryanair Flight, Plane Window Break, Emergency Landing, Greece Flight News, Air Pressure Incident, Flight FR1879, Aviation News, Plane Engine Failure, Aircraft Emergency, World News
