राज्यात पावसाचे पुनरागमन, वीज कोसळून ३ ठार, मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील अनेक भागांमध्ये पुनरागमन करत दिलासा देणाऱ्या मुसळधार पावसाने तिघांचे बळी घेतले आहेत. धुळ्यामध्ये मुसळधार पावसात वीज कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाला असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. धुळे आणि भिवंडी येथे वीज कोसलळ्यामुळे ४ जण गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे. धुळे जिल्ह्यातील पाडळदे या गावात झाडाववर ही वीज कोसळली. यावेळी एका झाडाखाली आसरा घेतलेला पंकज ज्ञानेश्वर राठोड (१४) याचा जागीच मृत्यू झाला. यात लखन राठोड (६) आणि हितेश राठोड (१०) हे दोघे जखमी झाले. तसेच, यात एक म्हशीचाही मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथे दुसरी घटना घडली. या घटनेत दीपाली गिरासे (१५) हिचा वीज कोसळून मृत्यू झाला.
भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी रस्त्यावर असलेल्या झिडके गावाजवळ उंबरपाडा या आदिवासी वस्तीच्या ठिकाणी वीज कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या प्रमिला मंगल वाघे (२०) या महिलेचा मृत्यू झाला आहे. यात प्रमिला यांच्या आई अलका वाघे (५२) आणि बहिणीचा मुलगा विजय अजय बोंगे (४) जखमी झाले.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे पुनरागमन झाले असून हवामान विभागाने पालघर, ठाणे जिल्ह्यात आज (रविवार) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच आज (रविवार) दक्षिण कोकणात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याबरोबरच पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी, जालना, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढील चार दिवस मुंबईतही काही ठिकाणी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसर, बोरिवली, ठाणे, भाईंदर, डोंबिवली आणि नवी मुंबईत चांगला पाऊस झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.