#LiveUpdate | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसराही दिवस गदारोळात; विरोधकांचा NEET प्रकरणावर सरकारला घेराव
• Live Update
विद्यार्थ्यांचा प्रश्न कोणत्याही पक्षाचा नाही; लोकसभेत अखिलेश यादव यांचा सरकारवर हल्लाबोल
समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी लोकसभेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हे, तर देशातील विद्यार्थी आणि तरुणांचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले.
अखिलेश यादव म्हणाले, “हा काँग्रेस, समाजवादी पक्ष किंवा भाजपचा मुद्दा नाही; हा विद्यार्थी आणि तरुणांचा प्रश्न आहे. सरकारने ज्या प्रकारे वागणूक दिली, त्यात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला. त्यामुळे आम्हाला पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करावे लागले. पंतप्रधान बाहेर वक्तव्य करू शकतात, तर ते संसदेत या विषयावर का बोलत नाहीत?”

NEET पेपरफुटीवर चर्चेसाठी सरकार तयार – किरेन रिजिजू
लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार पहिल्या दिवसापासून तयार आहे. चर्चेचा कालावधी आणि कोणत्या नियमांतर्गत चर्चा होणार, याबाबत सर्व पक्षांच्या फ्लोअर लीडर्सशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.”
“देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रचनात्मक चर्चा व्हावी, हीच सरकारची भूमिका आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना रणौत यांचा सवाल
भाजप खासदार कंगना रणौत यांनी राहुल गांधींवर टीका करत म्हटले, “काल मोठी सुरक्षा त्रुटी झाली. आंदोलन जंतर-मंतरवर सुरू असताना राहुल गांधी आंदोलकांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत होते. हा देशाच्या सुरक्षेचा गंभीर विषय आहे.”
NEET प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या, “सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, असे म्हणण्याचे कोणतेही कारण नाही.”

विद्यार्थ्यांवरील कारवाई लोकशाही विरूद्ध; प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका केली. “विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत. पेपरफुटीच्या घटना वारंवार घडत आहेत. शांततेत आंदोलन करणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. मात्र विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली कारवाई आणि संसदेत घडणाऱ्या घटना लोकशाहीला धरून नसल्याचे,” त्या म्हणाल्या.
काळे कपडे घालून विरोधकांचा संसद परिसरात निषेध
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसद परिसरात काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला.
काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, “दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाई, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावर कायम ठेवण्याचा निर्णय आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकारने दिलेल्या प्रतिसादाच्या विरोधात आम्ही काळे कपडे परिधान केले आहेत.”

मंगळवारी लोकसभेचे कामकाज विरोधकांच्या सातत्यपूर्ण घोषणाबाजीमुळे तीन वेळा तहकूब करावे लागले. विरोधी पक्षांनी NEET पेपर लीक प्रकरण, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि राम मंदिर देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली.
संसदेबाहेरही विरोधकांचे आंदोलन
संसदेतील गदारोळासोबतच विरोधी पक्षांनी संसद परिसरातही केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले. सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर तीव्र टीका केली.
‘मंगल मिलन’ नावाने NDA संसदीय पक्षाची पहिली बैठक
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या संसदीय पक्षाची मंगळवारी संसद भवनात बैठक झाली. नव्याने स्वीकारलेल्या ‘मंगल मिलन’ या नावाखाली झालेली ही पहिली बैठक होती.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नुकत्याच निवडून आलेल्या राज्यसभा सदस्यांचे स्वागत करण्यात आले. पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आघाडीतील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पुढील दिवशीही संघर्षाची शक्यता
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच NEET पेपर लीक प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन, परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि इतर मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
