धक्कादायक : स्वारगेट बस स्थानकामधील पीडिता चर्चेतील आरोपांनी व्यथित , वैद्यकीय तपासणीही पुरुष डॉक्टरांकडून…. !! , गावकऱ्यांनी नाकारले लाख रुपयाचे बक्षीस…

पुणे : स्वारगेट बस स्थानकामधील अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणी आरोपीच्या अटकेनंतर त्याच्या वकिलांनी दिलेल्या वक्तव्यानंतर कमालीची व्यथित झाली असल्याचे वृत्त आहे. यामुळे आपल्याकडेच संशयाच्या नजरेतून पाहण्यात येऊ लागले. त्यातच, सोशल मीडियावर देखील विविध चर्चांना उधाण आले. यावरून पीडित मुलीने थेट वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला आहे. आरोपी दत्ता गाडेने तिच्यावर अतिप्रसंग केला, त्यानंतर तिला हवी तशी मदत कुठेच मिळाली नाही. यासह ससूण रुग्णालयात देखील तिची तपासणी महिला डॉक्टरांकडून न करता पुरुष डॉक्टरांकडून करण्यात आल्याचे तिने सांगितले.
एकीकडे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असताना , विरोधकांकडून आणि माध्यमांकडून झालेल्या टीकेनंतर सरकारने तत्काळ पाऊले उचलत आरोपीला अटक केली असली तरी पीडितेने मोरे यांच्याशी बोलताना आपले मन मोकळे केले आहे.
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी 25 फेबुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलात्कार झाला. या घटनेनंतर समाजातून आणि समाजमाध्यमातून संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, आरोपीच्या अटकेनंतर त्याने पीडिता व त्याचे संबंध संमतीनेच असून केवळ पैशामुळेच माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. त्यानंतर, पीडितेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. पण, पीडितेनं शिवसेना नेते वसंत मोरे यांची भेट घेऊन त्यांना सगळा घटनाक्रम सांगितला आहे. बलात्काराच्या घटनेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी गेल्यावर पीडितेची तपासणी महिला डॉक्टरांनी करणे आवश्यक होते, पण ससूण रुग्णालयात पीडितेची तपासणी पुरुष डॉक्टरांनी केली. त्यानंतर, तिच्यावर आरोप करण्यात आले की, तिने 7500 रुपये घेतले, संमतीनेच हे झालं आहे. मात्र, या आरोपांमुळे ती पीडित तरुणी तणावग्रस्त झाल्याचे शिवसेना नेते वसंत मोरे यांनी सांगितले.
ती स्वत:चे जीवन संपवून टाकायचा विचार करत होती…..
पीडितेची बॅग 48 तास पोलीस स्टेशनमध्ये होती, मग पोलिसांना तिच्या बॅगेत साडे सात हजार सापडले का, असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. मी आज सकाळपासून पीडित मुलीसोबत आहे, तिची संपूर्ण बाजू मी ऐकून घेतली असून तिला आधार देण्याचं काम केलंय. तिच्यावर होत असलेल्या आरोपावरुन ती अत्यंत तणावात होती, ती स्वत:चे जीवन संपवून टाकायचा विचार करत होती. कारण, गेल्या काही दिवसांत तिच्यावर झालेले आरोप ही तिच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करणार आहेत. त्यामुळे, ती तणावात होती. आज तिने स्वत: फोन करुन माझ्याशी संपर्क साधला. मला भेटल्यानंतर तिने घटनाक्रमही सांगितला. ज्यावेळी आरोपी माझ्यावर अतिप्रसंग करत होता, तेव्हा माझ्या डोक्यात अनेक विचार येत होते. माझ्यासोबत कोलकातामधील घटनेसारखं तर होणार नाही ना, माझ्या आई आणि भावाचं काय होईल? असा प्रश्न मनात येत होता. त्यामुळे, दुसरा विचारच करू शकत नव्हते, असे पीडितेने म्हटल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे. तसेच, या घटनेनंतर मी पहिल्यांदा बस ड्रायव्हर आणि कंडक्टरकडे गेले व त्यांना याची माहिती दिल्याचे वसंत मोरे यांनी सांगितल. विशेष म्हणजे तिच्यासमोर आरोपी पळून गेला, ती बसमधून ओरडत होती, अशी देखील माहिती मोरे यांनी दिली आहे.
पीडितेसाठी वसंत मोरेंची न्यायालयात धाव….
पुण्यातील स्वारगेट डेपोत एसटीमध्ये बलात्कार झालेल्या पीडितेची बदनामी सुरू आहे, ती बदनामी थांबवण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर उद्या सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे. विधितज्ञ असीम सरोदे आणि ठाकरे शिवसेनेचे नेते वसंत मोरेंनी यासाठी पुढाकार घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत याप्रकरणात संबंधित व्यक्तींशिवाय इतर व्यक्तींनी बोलू नये, अशी भूमिका आम्ही न्यायालयात मांडली आहे. कारण, आरोपीचे जे वकिल बोलले की 7 हजार 500 रुपयांचा आर्थिक व्यवहार झालाय, त्यांची ही चूक आहे. ती मुलगी सुशिक्षित आहे, चांगल्या घरची आहे, या घटनेमुळे तिची इज्जत गेलीय, असे वसंत मोरे यांनी म्हटले. तर, आरोपीची बायको, आई ह्या नेमकं कुणाची भाषा बोलत आहेत. तिने आरडाओरड केली नाही असं जर राज्याचे गृहमंत्री म्हणत असतील तर, आरोपीची बायकोही तीच भाषा बोलणार ना, असेही मोरे यांनी म्हटलं आहे.
गावकऱ्यांनी लाख रुपयाचं बक्षीस नाकारलं
दरम्यान स्वारगेट डेपो बलात्कारातील नराधम दत्तात्रय गाडेला पकडून देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, आम्ही एक लाख रुपयांसाठी आरोपीला पकडून दिलं नाही. आधीचं दत्तात्रयमुळं आमच्या गुनाट गावची बदनामी झाली होती, अशात एक लाख रुपयांसाठी आमच्या गावात श्रेयवाद रंगलाय, अशी चर्चा रंगवून आम्हाला आणखी बदनाम केलं जातंय. म्हणूनच, आम्हाला आता बक्षीस नकोय, अशी भूमिका गुनाटच्या ग्रामस्थांनी घेतली आहे.