Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनोज जरांगे यांची महायुती आणि महाविकास आघाडी दोघांच्याही विरोधात टीका… यांना पाडण्यात सुद्धा विजय…!!

Spread the love

नाशिक :लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करत आहे. आज नाशिक जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील आले असता त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला आम्ही पाडणार आहे. यांनी आम्हाला फसवलंय, असा निर्धारच मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. विशेष म्हणजे जरांगे पाटील यांनी आपण राजकारणात पडणार नसून आपल्या अय बहिणींना झोडपणारांना माफ करू नका असे म्हटले होते आता मात्र त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही पाडण्याचे आवाहन केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगळे जण सारखेच आहेत. तिघांनी बनून षड्यंत्र केलंय. किती दिवस मराठ्यांची फसवणूक करणार आहात. मागच्या काळात आमचा महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आणि आताही महायुतीच्या सरकारने तेच केले आहे. या दोघांना निवडणुकीत पाडा, असे मनोज जरांगे पाटलांनी म्हंटले आहे. लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे म्हणाले की, हे दोन महिने म्हणजे यांचा पोळा आहे. यांच्यात विनाकारण जाऊ नका, फक्त मजा बघा.मराठा समाज वेळेला करेक्ट कार्यक्रम करणार आहे. टप्प्यात आल्यावर आम्ही कार्यक्रम करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. ते पुढे म्हणाले की, मराठ्यांनो निवडणुकीला उभ राहण्यापेक्षा यांना पाडा. यांना पाडण्यात सुद्धा विजय आहे, मला समाजाव्यतिरिक्त बाकी काहीही कळत नाही. ६ जूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला उमेदवार देणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक जिल्ह्यात पाय ठेवताच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली. त्यानंतर ते छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघातील भरवस फाटा येथे संत तुकाराम संगीत गाथा सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाला पोहोचले.

मनोज जरांगे-शांतीगिरी महाराज मंचावर एकत्र

दरम्यान मनोज जरांगे पाटील या सोहळ्याला पोहोचताच तिथे मोठी गर्दी झाली. यामुळे काही काळ गोंधळ उडाल्याचे दिसून आले. तर आयोजकांकडून भविकांसह माध्यमांच्या प्रतिनिधी, कॅमेरामन्सला धक्काबुक्की करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि स्वामी शांतिगिरी महाराज या सोहळ्यात एकाच मंचावर मांडीला मांडी लावून बसल्याचे दिसून आले. शांतिगिरी महाराज लोकसभेसाठी नाशिकमधून इच्छूक आहेत. महंत स्वामी सिद्धेश्वरानंद, मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकरही हे देखील या सोहळ्यात उपस्थित असून दोघेही लोकसभेसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे मंच हरिनाम सप्ताहाचा, चर्चा मात्र लोकसभा निवडणुकीची रंगली आहे.

जरांगेंचा भुजबळांवर हल्ला बोल

निवडणुकीला उभे राहणं हा छगन भुजबळ यांचा धंदा आहे. स्वतः मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा भुजबळांचा धंदा आहे. आमच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्या आहेत. भुजबळ आणखी किती दिवस खोटं बोलणार आहेत. तुम्ही विरोध करत राहा, मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊनच दाखवणार, असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिला आहे. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यावरून ओपनच्या मतदारसंघात हे निवडणूक का लढवतात? असा सवाल मनोज जरांगेंनी भुजबळांना विचारला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!