Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आरएसएसच्या गर्भगृहात शूद्र, दलित आणि महिलांना प्रवेश नाही, भाजपा-आरएसएसच्या जाळ्यात अडकू नका : सिद्धरामय्या

Spread the love

बंगळूरू : राजकीय ताकद तेव्हाच मिळते जेव्हा आपल्याकडे वैचारिक स्पष्टता असते. लोकांनी भाजपा-आरएसएसच्या जाळ्यात अडकायला नको. आरएसएसच्या गर्भगृहात शूद्र, दलित आणि महिलांना प्रवेश नाही. त्यांनी मला देशाच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानपदाची ऑफर दिली  तरी मी कधीही भाजपामध्ये प्रवेश करणार नाही असे उद्गार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी  काढले आहेत.

कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार एम. लक्ष्मण यांच्या प्रचारासाठी जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित एससी-एसटी कार्यकर्ता आणि नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. एखाद्या महिलेला पतीच्या निधनानंतर जिवंत जाळले जायचे. मानुस्मृतीतून ही अमानुष प्रथा आली. आमच्या संविधानात हे सर्व निषिद्ध आहे. त्यामुळे संविधानात बदल करून त्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आहे. दलितांना, महिलांना केवळ वापरण्याची त्यांची नीती आहे . संविधानवादी मतदारांनी हा मुद्द्दा लक्षात घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले  की, “मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडेन, असे सांगणारे देवेगौडा आता मोदींशी आपले  अतूट नाते  असल्याचे  सांगत आहेत. राजकारण्यांमध्ये वैचारिक स्पष्टता असली पाहिजे. भाजपा आणि आरएसएस सामाजिक न्यायाच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांना आरक्षण आवडत नाही. आरक्षण ही भीक नाही. हा शोषित समाजाचा हक्क आहे. जोपर्यंत समाजात जातीव्यवस्था आहे तोपर्यंत आरक्षण टिकले पाहिजे.”

काँग्रेसने अर्थसंकल्पात दलित लोकसंख्येनुसार निधीची तरतूद करण्याचा कायदा केला. आपल्या सरकारने 24.1 टक्के विकास निधी बाजूला ठेवावा असा कायदा केला आहे. हा पुरोगामी कायदा देशातील कोणत्याही भाजपा सरकारने लागू केलेला नाही, फक्त आमच्या काँग्रेस सरकारनेच केला आहे. या सर्व वस्तुस्थितीचे समाजाने भान ठेवायला हवे असेही ते म्हणाले.

“आमच्या काँग्रेस सरकारने दलितांना कंत्राटी पद्धतीतही आरक्षण लागू केले . मंडल अहवाल आणि मागासवर्गीय आरक्षणाला विरोध करणारा हाच भाजप नाही का? एससीपी/टीएसपी कायदा काँग्रेस सरकारने बनवला होता. त्यामुळे भावनिक चिथावणी देणाऱ्या आणि गरिबांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांना पाठिंबा न देता काँग्रेसचे उमेदवार एम. लक्ष्मण यांना विजयी करा” असे आवाहन सिद्धरामय्या यांनी केले  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!