Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaAghadiNewsUpdate : इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक , लोकसभा निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्धार..

Spread the love

नवी दिल्ली :  कॉँग्रेससाहित विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक उद्या मंगळवारी 19 डिसेंबर रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आली असून या बैठकीसाठी सर्व  प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. आज शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. उद्या होणाऱ्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि संयुक्त जाहिरनामा या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नुकत्याच हाती आलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर साडेतीन महिन्यानंतर ही बैठक होत आहे. इंडिया आघाडीतील बैठकीत २७  पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी सहभागी होणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला, पीडीपीकडून मेहबूबा मुफ्ती, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि आरएलडीचे जयंत चौधरी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय अपना दलाकडून (कमेरावादी) कृष्णा पटेल, जेडीयूकडून नितीश कुमार,  आरजेडीकडून लालन सिंग, लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव, सीपीआयएमएलकडून दीपंकर भट्टाचार्य, सीपीएमकडून सीताराम येचुरी, सीपीआयकडून डी. राजा, तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार हे नेते शिवसेनेचे उद्धव ठाकरे, द्रमुक पक्षाचे एमके स्टॅलिन, मुस्लिम लीगचे कादर मोहिद्दीन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, केरळ काँग्रेसचे जोश के मणी, आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन आणि व्हीसीकेचे थिरुमावलावन, एमडीएमकेचे वायको, केरळ काँग्रेसचे पीसी थॉमस जोसेफ, फॉरवर्ड ब्लॉकचे जी देवराजन, एमएमकेचे मोहम्मद जवाहिरुल्ला, ई.आर. शेकापचे जयंत पाटील आदी नेते दिल्लीतील बैठकी उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्धार

मुंबईत ऑगस्ट महिन्यात इंडिया आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत आघाडीतील पक्षांनी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. शक्य होईल त्या ठिकाणी भाजपविरोधात संयुक्त उमेदवार देण्यात येणार आहे. आघाडीने काही समित्यांचीही स्थापना केली आहे.

 काँग्रेस  लढवू शकते सुमारे 310 जागा

विधानसभा निवडणूक निकालानंतर आघाडीतील मित्रपक्षांकडून आता काँग्रेसकडे अधिक जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार, काँग्रेस सुमारे 310 जागांवर निवडणूक लढवू शकते आणि मित्र पक्षांसाठी सुमारे 230 जागा सोडू शकते असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी आणि अरविंद सावंत आणि आपचे खासदार राघव चड्ढा उपस्थित होते.

सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंची भेट

उद्या मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. तसेच उद्धव ठाकरेंना भेटायला जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक येणार आहेत. काही दिवसांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी पुलवामा दहशतवादी घटनेवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर आरोप करत अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यामुळे त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची होणारी भेट ही महत्त्वाची मानली जाते.

ईडीचे केजरीवाल यांना समन्स

अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीने 21 डिसेंबर रोजी केजरीवाल यांना चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांच्या आगामी बैठकीतही या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल हे विपश्यनेसाठी जाणार असून 30 डिसेंबरपर्यंत ते उपस्थित राहणार नसल्याची माहितीही अलीकडेच समोर आली आहे. त्याच वेळी ईडीने त्यांना नोटीस पाठवल्याने त्यावर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!