Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NagpurNewsUpdate : दिक्षाभूमीच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता

Spread the love

नागपूर : दीक्षाभूमीच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एनएमआरडीए) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, हरियाणा गुडगावच्या वायएफसी-बीबीजी कंपनीला काम देण्यात आले असून विकासकामांसाठी १३० कोटीचा कार्यादेशही जारी करण्यात आल्याचे नमूद केले.

अनुयायांच्या सोयीच्या दृष्टीने दीक्षाभूमीचा विकास व सौदर्यीकरणासंदर्भात ॲड. शैलेश नारनवरे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेली जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष याप्रकरणी सुनावणी झाली. कार्यकारी अभियंता (प्रकल्प विभाग) संजय चिमुरकर यांनी शपथपत्र सादर करीत ही माहिती न्यायालयाला दिली.

याचिकेनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे दीक्षाभूमीचे नाव संपूर्ण जगभरात गेले आहे. या निमित्ताने दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देश-विदेशातून लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. मात्र, अनुयायांची होणारी गर्दी व त्या तुलनेत प्राथमिक सुविधांचा अभाव लक्षात घेता लोकांची चांगलीच गैरसोय होते.विशेष म्हणजे, दीक्षाभूमीला ‘अ’ पर्यटनाचा दर्जा आहे. त्यामुळे, शेगाव देवस्थानाच्या धर्तीवर विकास आराखडा तयार करून धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, आरोग्य सुविधा व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून दीक्षाभूमीचा सर्वांगिण विकास करण्यात यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. पुढील सुनावणी १३ डिसेंबर रोजी निश्‍चित केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. शैलेश नारनवरे यांनी स्वत: बाजू मांडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!