Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ManipurViolenceUpdate : ४८ दिवस लोटले मणिपूरची आग थांबेना , जातीय हिंसाचारानंतर जमिनींवर कब्जा

Spread the love

इंफाळ : मणिपूरमध्ये आरक्षणाच्या मुड्डय्यावारून सुरु झालेल्या जातीय हिंसाचारानंतर आता जमीन बळकावण्यावरून दंगलीची आग धुमसत आहे. मणिपूरमधील हिंसाचारात ५० हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले असून अनेक गावे ओसाड पडली आहेत. सूत्रांनुसार, २० हून अधिक गावांवर काही गटांनी ताबा मिळवला आहे. मैतेई समाजाचे वर्चस्व असलेल्या गावांनी कुकी गावे ताब्यात घेतली आहेत.तयार कुकी समाजाचा दबदबा असलेल्यांनी मैतेई गावे ताब्यात घेतली आहेत. यामध्ये दंगलखोरांनी एकमेकांची घरेही ताब्यात घेतली आहेत.

यासाठी दंगेखोरांकडून बंकरचा वापर करण्यात येत असून या बंकरमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले लढवय्ये सज्ज असल्याचे चित्र आहे. चुराचांदपूर, बिष्णुपूरमध्ये गावातील जमिनींवरील अशा अतिक्रमणांची प्रकरणे सर्वाधिक आहेत. बिष्णुपूरच्या ग्वांताबी, चेरेल मंगजिंग, फुगाकचाओ इखाई, अवांग लेकाईचा पश्चिम भाग आणि लेगँगमध्ये अनेक ठिकाणी मैतेई लोकांचे बंकर आहेत. चुराचांदपूर जिल्ह्यातील काही गावांत कुकी लोकांचे बंकर आहेत. काही कुकी लोकांनी रविवारी रात्री बिष्णुपूरमधील नापत आणि तंगजेंग गावे ताब्यात घेतली. खरे तर सरकारने फेब्रुवारी महिन्यात चुराचांदपूर, नोने या आदिवासीबहुल गावांच्या जमिनी संरक्षित वनाच्या श्रेणीत समाविष्ट केल्या होत्या. यावरून हिंसाचारही झाला. मणिपूरचे क्षेत्रफळ २२३२७ चौरस किमी आहे. सुमारे ३२ लाख लोकसंख्या असलेल्या मणिपूरमधील ५५% मैतेई आहेत.

दरम्यान मणिपूरमधील हिंसाचार सोमवारी ४८ व्या दिवशीही सुरूच आहे . पश्चिमेकडील जिल्ह्यातील केएमएच लेइमाखोंग येथे झालेल्या गोळीबारात एक जवान जखमी झाला. खमेनलोक येथील एका चर्चला जमावाने आग लावली, तर इंफाळ आणि बिष्णुपरमध्ये १०० हून अधिक घरे जाळण्यात आली. यारीपोक येथे रेडिमेड कपड्याने भरलेला ट्रक जाळण्यात आला. इंफाळच्या बाहेरील भागात आणि अंतर्गत भागात सीआरपीएफ तैनात केले आहेत.

आसाम रायफल्सच्या जवानांनी १९ जून रोजी रात्री १० वाजता थौबलहून मणिपूरमधील इंफाळच्या दिशेने येणाऱ्या वाहनातून ५१ मिमी मोर्टार जप्त केले. सामान्य तपास आणि तपासणी कर्तव्यादरम्यान, आसाम रायफल्सच्या कर्मचार्‍यांनी टाटा सफारी रोखली. शोधादरम्यान, सुरक्षा दलांनी एक मोर्टार जप्त केला आणि चार जणांना अटक केली. हाओरोंगबम रणजीत, नगंगोम शांता मीतेई, अबुजम नौबा आणि मुटुम रॉबिंद्र अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नंतर, त्यांना आज लिलाँग पीएसकडे सोपवण्यात आले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पुढे असे वृत्त आहे की आज पहाटे ४ च्या सुमारास या अटकेच्या निषेधार्थ मोठ्या जमावाने लिलाँग पीएसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु थौबल जिल्हा पोलिस आणि आसाम रायफल्सच्या पथकाने त्यांना पांगवले. त्यानंतर, अटकेच्या निषेधार्थ थौबल जिल्ह्यांतील विविध ठिकाणी स्थानिकांनी रस्ते रोखून धरल्याचे वृत्त आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!