Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“संविधान विरोधकांना खुशाल काफीर म्हणा”, समता दिंडीत पैगंबर शेख यांचे आवाहन

Spread the love

पुणे : जे संविधान विरोधी आहेत, त्यांना खुशाल काफिर म्हणा, असे आवाहन पैगंबर शेख यांनी व्यक्त केले. ते समताभूमी फूलेवाडा (पुणे) येथे बोलत होते. “सत्याचा असत्याशी, नितीचा अनितीशी, प्रेमाचा द्वेषाशी संघर्ष म्हणजे धर्मयुध्द,” असे मत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज यांनी केले. संविधान समता दिंडीचा प्रस्थान सोहळा मंगळवारी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली समताभूमी फूलेवाडा (पुणे) येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

चोपदार राजाभाऊ महाराज म्हणाले, “धर्मयुद्ध हे दोन धर्मीयांमध्ये असतं असं हल्ली समजलं जातं. मग रामायण, महाभारत यातील युद्धालाही धर्मयुद्ध म्हटलं जातं. तिथं कोणते दोन धर्म होते? दोन्ही युद्धातील प्रतिस्पर्धी हिंदूच होते. मग ते धर्मयुद्ध नव्हतं का? तर होतं. ते युद्ध कोणत्या धर्माचं कोणत्या धर्माविरोधात होतं? तर ते होतं सत्य विरुद्ध असत्य, निती विरुद्ध अनिती, प्रेम विरुद्ध द्वेष.” “आज आपल्याला धर्मयुद्ध करायचेच असेल तर असत्य, अनिती आणि द्वेषाविरोधात केले पाहिजे,” असे आवाहन चोपदार राजाभाऊ महाराज यांनी केलं. संविधानातील कलमे संतांच्या भाषेत म्हणजेच सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न व्हावेत अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

“संविधान विरोधक तो काफीर”

यावेळी काफिर म्हणजे काय हे समजावून सांगताना पैगंबर शेख म्हणाले, “सर्वांनी स्वीकारलेला विचार जो मानत नाही तो काफिर असतो. आज संविधान सर्वांनी मान्य केले आहे. म्हणून आजच्या काळात जो संविधान मानत नाही तो खुशाल काफिर समजावा.” यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी उपस्थित महिलांना शिक्षणाचे महत्त्व ओव्या आणि अभंगांमधून समजावून दिले आणि संविधानामूळेच सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला असल्याचे स्पष्ट करून संविधानाचे महत्त्व सांगितले.

“कुठल्याही एका समाजाविरुद्ध द्वेष पसरवणं संतविचारांमध्ये बसत नाही”

यावेळी बोलताना सुभाष वारे यांनी “कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पुजनाचे” या अभंगाचा दाखला दिला. ते म्हणाले, “जर कुणी चुकत असेल तर त्या व्यक्तीला चुकीची जाणीव करून देवून समजावले पाहिजे. प्रसंगी कायदेशीर कारवाईची मागणी आपण करू शकतो. मात्र, कुठल्याही एका समाजाला लक्ष्य करून त्या समाजाविरुद्ध द्वेष पसरवणं हे संतविचारांमध्ये बसत नाही.” तर माधव बावगे यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्य हे संतविचारांना समोर ठेवूनच चाललेले आहे हे आवर्जून मांडले. वर्षा देशपांडे यांनी कुठलंही काम यशस्वी व्हायचं असेल तर त्यात महिलांचा सहभाग किती महत्वाचा आहे असे सांगून संविधान समता दिंडीच्या अभियानात सतत सोबत राहू असा विश्वास दिला.

काँग्रेसचे नेते अभय छाजेड यांनी संतविचारांची व्यापकता मांडत संविधान समता दिंडीला शुभेच्छा दिल्या. संविधान समता दिंडीचे चालक आणि पूरोगामी किर्तनकार ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराजांनी संतविचार आणि संविधान विचारांची परस्परपूरकता यावर उपस्थितांशी संवाद साधला. शाहिर शीतल साठे आणि शाहीर सचिन माळी यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. राजवैभव यांनी प्रास्ताविक केले तर साधना शिंदे यांनी आभार मानले. सरस्वती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नागेश जाधव, शितल यशोधरा, सरस्वती शिंदे, साधना शिंदे, विशाल विमल, दीपक देवरे, सुमित प्रतिभा संजय, दत्ता पाकिरे, सुदर्शन चखाले, राजवैभव या युवा साथींनी शामसुंदर सोन्नर महाराजांच्या मार्गदर्शनात संविधान समता दिंडी प्रस्थान कार्यक्रमाचे नियोजन केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!