Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SharadPawarNewsUpdate : ‘मोदी है तो मुमकिन है’ ही कल्पना लोकांनी नाकारली, लोकांना आता बदल हवाय : शरद पवार

Spread the love

मुंबई : ‘मोदी है तो मुमकिन है’ ही कल्पना लोकांनी आधीच नाकारली आहे. लोकांना महाराष्ट्रातही बदल हवा आहे आणितो पुढच्या निवडणुकीमध्ये दिसेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे . कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना ते म्हणाले की , कर्नाटकात भाजपचा पराभव करणे हाच आमचा उद्देश होता. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल, असे मी गेल्या आठ-दहा दिवसांपासून जाहीर सभांमध्ये सांगत होतो. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक ठिकाणी सभा आणि रोड शो केले असले तरी, लोकांचा रोष मतांच्या माध्यमातून व्यक्त होईल याची आम्हाला खात्री होती.

दरम्यान भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी आता महाराष्ट्रात एकत्र येणार असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र बसून पुढची योजना आखली पाहिजे, असं पवार म्हणाले. यासाठी, लवकरच ते सर्व पक्षांची एकत्रित बैठक घेणार आहेत.

कर्नाटकात काँग्रेसला भाजपपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या. सत्तेचा गैरवापर, यंत्रणांचा गैरवापर आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे वैतागलेल्या जनतेने भाजपला धडा शिकवल्याचं शरद पवार म्हणाले. मुळात भाजपचं राजकारण कर्नाटकच्या जनतेला आवडलं नव्हतं, त्यामुळे काँग्रेसचा विजय झाल्याचं ते म्हणाले. देशात चुकीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवल्याबद्दल मी कर्नाटकच्या जनतेचे आणि काँग्रेस पक्षाचे अभिनंदन करतो, असे शरद पवार म्हणाले. संपूर्ण देशात हीच स्थिती येईल, असेही ते म्हणाले.

मोदी-शाह यांनी सभा घेऊनही परिणाम नाही

मोदी-शाह यांनी कर्नाटकमध्ये सभा घेऊनही काहीही परिणाम झाला नसल्याचे शरद पवार म्हणाले. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, तिथे आमदार फोडण्याचे सत्र भाजपने सुरु केले होते, असे शरद पवार म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी जसा महाराष्ट्रात केला, तसाच प्रकार कर्नाटकात झाला. मागच्या वेळी कर्नाटकातही भाजपने फोडाफोडीचं राजकारण करुन डबल इंजिन सरकार स्थापित केल्याचं ते म्हणाले. त्यानंतर मध्य प्रदेश, गोव्यातही भाजपने फोडोफोडी केली होती. मात्र यावेळी जनतेने ती संधी भाजपला दिली नसल्याचे शरद पवार म्हणाले.

भारत जोडो यात्रा कर्नाटक निवडणुकीत उपयोगी

बहुसंख्य राज्यामध्ये भाजप सत्तेबाहेर आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल या बहुतांश राज्यांमध्ये भाजप सत्तेबाहेर असल्याचे पवार म्हणाले. कर्नाटक निवडणुकीत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कामी आली असं म्हणता येईल.२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा देशात काय चित्र असेल याचा अंदाज कर्नाटक निवडणुकीवरून येऊ शकतो, असे शरद पवार म्हणाले. धर्म आणि जातीच्या मुद्द्यावरुन निवडणूक जिंकता येत नाही, असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराला दर्शवला होता पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्नाटकात शक्तिशाली आहे अशी स्थिती नाही, पण तरीही प्रयत्न म्हणून आम्ही काही उमेदवार उभे केले, असं शरद पवार म्हणाले. निपाणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार उत्तमराव पाटील यांना आम्ही शक्ती दिली होती, तिथे निर्णय येईल अशी अपेक्षा होती, असे पवार म्हणाले. पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये पाटील पहिल्या क्रमांकावर होते, पण नंतर ते दुसऱ्या क्रमांकावर गेले. यशाची शाश्वती नाही, पण कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. भाजपचा पराभव करणे हे आमचे खरे उद्दिष्ट होते, असेही शरद पवार म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!