AccidentNewsUpdate : देवकार्यासाठी निघालेल्या संभाजीनगरातील दोन कुटुंबियांवर शोककळा , ६ ठार , ७ जखमी

बुलडाणा : समृद्धी महामार्गावरील मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. यात सहा जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर बहुतांश जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-११ मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे.
हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान घडला. भरधाव वेगातील इर्टिगा गाडी ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये घुसली व तीन ते चार पलट्या मारून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातग्रस्त ईर्टीगाचा क्रमांक एम एच २० – ८९६२ आहे. कारचे मालक हे सुरेश बर्वे हे असल्याची माहिती आहे. ते संभाजीनगरातील एन-११ द्वारकानगरचे रहिवासी असून एमएसईबीचा कर्मचारी आहे. ते त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी समृद्धी महामार्गावरून जात होते. अपघात एवढा भीषण होता की, समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवर वाहतूक काही काळ पोलिसांनी थांबविली होती. तर या अपघातातील मृत आणि जखमी सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे बोलले जात आहे.
मृत्यूंची नावे
हौसाबाई भरत बर्वे (वय ६०)
श्रद्धा सुरेश बर्वे (वय २८)
किरण राजेन्द्र बोरुडे (वय ३५)
भाग्यश्री किरन बोरुडे (वय २८)
प्रमिला राजेन्द्र बोरुडे (वय ५८ )
जानवी सुरेश बरवे (वय १२ वर्ष)
जखमींची नावे
नम्रता रविन्द्र बर्वे (वय ३२)
रुद्र रविन्द्र बर्वे (वय १२)
यश रविंद्र बर्वे वय १०वर्षे
सौम्या रविंद्र बर्वे (वय ४)
जतीन सुरेश बर्वे (वय ४)
वैष्णवी सुनिल गायकवाड (वय १९)
सुरेश भरत बर्वे (वय ३५) जखमींवर छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाऊण तास मदत नाही
स्थानिक प्रत्यक्षदर्शिंने दिलेल्या माहितीनुसार धक्कादायक बाब म्हणजे समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास तत्काळ मदत उपलब्ध असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी अपघात झाल्यावर पाऊण तास अपघातग्रस्तांना मदत मिळाली नाही. या आधीही याची प्रचिती आली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मेहकर टोल प्लाझा येथून फक्त १० किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातातील या जखमींना तत्काळ मदत मिळाली नाही.