मनोरंजन : सेन्सॉर बोर्डाने शाहरुखच्या पठाण बाबत घेतले हे निर्णय …

मुंबई : आपल्याकडे सध्या महत्वाच्या विषयाला सोडून रिकाम्या विषयावर लोक चर्चा करीत आहेत . आमिर खान याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमावर बहिष्कारानंतर आता शाहरुख खान याच्या आगामी ‘पठाण’ सिनेमावर बहिष्कार घालण्याची चर्चा सुरू झाली आहे. २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत असून शाहरुखच्या पठाण सिनेमातील बेशरम रंग या गाण्यावरील डान्स अत्यंत अश्लिल असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर दीपिकावर टीका देखील होत आहे. यात आणखी आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे या गाण्यात शाहरुख खानने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तर दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. यावरून सुरु झालेल्या वादावर सेन्सॉर बोर्डाने काही गोष्टींवर कात्री लावल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे या सर्व बदलांनंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला UA प्रमाणपत्र दिले असल्याचे वृत्त आहे. २ तास २६ मिनिटांचा हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका व्यतिरिक्त जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या वादानंतर माध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या पठाण सिनेमात १० हून अधिक कट केले आहेत. या माहितीनुसार, ‘रॉ’ शब्दाच्या जागी ‘हमरे’, ‘लंगडे लुल्ले’च्या जागी ‘तूटे फुटे’ शब्द वापरण्याचा सल्ला दिला. १३ ठिकाणी पीएम ऐवजी राष्ट्रपती किंवा मंत्री वापरावा आणि पीएमओ शब्द हटवण्यात यावा असेही आदेश देण्यात आले. ‘अशोक चक्र’ शब्दाच्या जागी ‘वीर पुरस्कार’ हा शब्द वापरावा तसेच ‘पूर्व-केजीबी’ची ‘पूर्व-एसबीयू’ शब्द वापरण्यास सांगितले. एवढेच नाही तर ‘मिस भारत माता’ या शब्दाऐवजी ‘आमची भारत माता’ हा शब्द वापरावा असेही सांगण्यात आले.
या अहवालात पुढे म्हटले की ‘स्कॉच’ शब्दाच्या जागी ‘ड्रिंक’ शब्द टाकण्यात आला, तर सिनेमात दिसणारा ‘ब्लॅक प्रिझन, रशिया’ हा मजकूर बदलून तो फक्त ‘ब्लॅक प्रिझन’ एवढाच करण्यात आला. याशिवाय बेशरम रंगमध्ये दीपिकाचे अनेक सीन साइड पोजने बदलले गेले आहेत. ‘बहुत तंग किया’ गाण्यातील कामुक नृत्य काढून टाकण्यात आले असून तिथे इतर शॉर्ट घालण्यात आले आहेत. दरम्यान दीपिकाच्या वादग्रस्त भगव्या बिकिनीवर सेन्सॉर बोर्डाने कात्री मारली की नाही हे अजून कळलेलं नाही.