Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : हातात मशाली घेऊन राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल …

Spread the love

नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून ती आज नांदेडमधील देगलूर या ठिकाणी पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या हातात मशाली दिसल्या. या यात्रेत राहुल गांधी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली आहे. यावेळी नागरिकांनी आपल्या हातात भारत जोडो यात्रेच्या स्वागताचे  बॅनर, झेंडे आणि राहुल गांधी यांची प्रतिमा हातात घेऊन त्यांचे भव्य स्वागत केले.  देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा पुढे मार्गक्रमण करणार आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.


काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली, ती श्रीनगर येथे संपणार आहे. ही यात्रा एकूण ३५०० किमीचा प्रवास करणार आहे. कन्याकुमारी, तामिळनाडू, कर्नाटक असा प्रवास केल्यानंतर ही पदयात्रा आता महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवस ही यात्रा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत.

महापरूषांना अभिवादन

राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तेलंगणातील कामीरेड्डी येथून आलेल्या पदयात्रेचे देगलूरमध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. नांदेड परिसरातील सर्व रस्त्यांवरून लोक देगलूरकडे राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जात होते. देगलूर येथून राहुल गांधी गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावरसिंघजी बाबा फतेहसिंघजी, वन्नाळी कडे पायी निघाले यावेळी जवळपास चार हजार मशालींसह हजारो भारतयात्री ही पदयात्रेने वन्नाळीपर्यंत गेले.


देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे…

नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देश जोडण्याचा आहे. देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. या भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो यात्रा आहे. ही पदयात्रा काश्मीरपर्यंत कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेदरम्यान पुढील १४दिवस महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींसह भाजपवर टीकास्त्र

आपल्या भाषणाची सुरुवात राहुल गांधी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देऊन केली. राहुल गांधी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील पदयात्रेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून करत आहे ही अभिमानाची बाब आहे. देशात आज ज्वलंत समस्या आहेत पण केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही, केवळ चार पाच भांडवलदारांसाठी हे सरकार काम करत आहे. नोटबंदीने देशातील छोटे व्यवसाय डबघाईला आले. ४०० रुपयांचा गॅस सिलेंडर ११०० रुपये झाला, पेट्रोल, डिझेल १०० रुपये लिटर झाले आहे , पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर एक चकार शब्दही बोलत नाहीत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.


देगलूर येथील कार्यक्रमात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंग, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस आणि विविध मित्रपक्षाचे नेते उपस्थित होते.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!