Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : राज्यात पावसाचा कहर चालूच, ९९ जणांचा मृत्यू , अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Spread the love

मुंबई : पावसाने काही जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस चालूच असून राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान  हवामान विभागाने पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पावसामुळे एकूण १४ एनडीआरएफच्या  आणि एसडीआरएफच्या ६ टीम  तैनात करण्यात आल्या  आहेत. गेल्या २४ तासांत ४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९९ वर पोहोचला आहे; १८१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ७,९६३ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची तसेच ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे ६५ किमी प्रतितास वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. हा इसहार लक्षात घेऊन प्रशासनाने  नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पालघर, पनवेल महापालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या, माध्यमिक आणि प्राथमिक शाळांना गुरुवार, १४ जुलै रोजी शिक्षण विभागाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर आणि पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

पर्यटन स्थळावर १४४ कलम

दरम्यान हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव , धबधबे आदी पर्यटनस्थळ परिसरात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

हवेली तालुक्यातील सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक, मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड, किल्ले विसापूर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, ड्युक्स नोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधीवरे खिंड, पवना परिसर, राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा, कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी परिसर, मुळशी तालुक्यातील अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड, भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ला, वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड, किल्ले तोरणा, पाणशेत धरण परिसर, मढेघाट, जुन्नर तालक्यातील किल्ले जीवधन, आंबेगाव तालुक्यातील बलीवरे ते पदरवाडी, भिमाशंकर ट्रेक (बैलघाट, शिडीघाट, गणवतीमार्गे) या ठिकाणी असलेले किल्ले, धबधबे, तलाव किंवा धरण या ठिकाणांच्या सभोवताली एक किलोमीटर परिसरात १७ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.

राज्यातील या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पालघर जिल्हा, पुणे आणि सातारा येथे आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान कोल्हापुरातील पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. पंचगंगा सध्या ३७ फूट ८ इंचावरून वाहत असून पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक पुलांवर आणि रस्त्यांवर पाणी आल्याने प्रशासनाकडून काही रस्ते बंद करण्यात आले आहेत.

नागपुरात वादळी पावसाची शक्यता

नागपूरमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर येथे काही ठिकाणी, अमरावती, वर्धा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!