प्रासंगिक : Blog | डॉ.श्रीमंत कोकाटे : सनातनी व्यवस्थेला विरोध करणारे महान क्रांतिकारक बसवण्णा !

भारतीय इतिहासामध्ये अनेक क्रांतिकारक महामानव झालेले आहेत. त्यापैकी एक क्रांतिकारक म्हणजे बाराव्या शतकातील बसवन्ना आहेत. त्यांचे मूळ नाव बसव असे आहे. बसव हे नाव कृषीसंस्कृतीचा निर्देश करते. त्यांना आदराने अण्णा म्हणत असत. अण्णा हा कन्नड शब्द आहे. हा मराठी भाषेतही वापरतात. अण्णा याचा अर्थ ज्येष्ठ, आदरणीय, मोठ्या भाऊ, आधारस्तंभ! बसवच्या मानवतावादी, लोककल्याणकारी, वैचारिक, महाबुद्धीमान वृत्तीमुळे लोक त्यांना आदराने बसवन्ना म्हणत असत.
सनातनी व्यवस्थेला विरोध
आजही कर्नाटकात किंवा कन्नड भाषेत त्यांना बसवन्ना असेच आदराने म्हटले जाते. त्यांच्या कार्याचा प्रभाव कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू ,ओरिसा, राजस्थान, काश्मीरसह वैश्विक तत्त्वज्ञान, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रावर पडलेला आहे. त्यांनी समता, बुद्धिप्रामाण्यवाद, प्रामाणिकपणा,एकेश्वरवाद, महिलांचे स्वातंत्र्य इत्यादी मूल्यांचा हिरिरीने पुरस्कार केला, त्यामुळे त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव जनमानसावर कायमचा राहिलेला आहे. त्यांनी पारंपारिक धार्मिक श्रद्धांना सुरुंग लावला. सनातनी व्यवस्थेला विरोध केला. वेदप्रामाण्य नाकारले. अंधश्रद्धांना विरोध केला. महिलांना हक्क अधिकार दिले. सत्तेचा उपयोग समाज क्रांतीसाठी केला. त्यांनी कोणत्याही प्रतिगामी शक्तींचा मुलाहिजा बाळगला नाही, त्यामुळे त्यांचे कार्य अजरामर झाले आहे.
अशा युगप्रवर्तक महामानवाचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे इस ११०५ साली झाला. आज त्या बागेवाडीला बसव बागेवाडी असे म्हटले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव मादीराज व आईचे नाव मादलांबिका होते. इंगळेश्वर हे त्यांचे आजोळ आहे. देवराज नावाचा मोठा बंधू तर अक्कनागम्मा ही बहिण होती. बसवण्णा हे अत्यंत श्रीमंत परिवारात जन्माला आले होते. सुख-समृद्धी ओसंडून वाहत होती. परंतु ते व्यक्तिगत सुखात रममाण होणारे संकुचित वृत्तीचे नव्हते.
धार्मिक कर्मकांड त्यांना मान्य नव्हते…
आई-वडिलांचा पूजा-अर्चा हे धार्मिक कर्मकांड त्यांना मान्य नव्हते. त्यापेक्षा गोरगरिबांना मदत करणे हाच खरा धर्म आहे. देवाने सर्वांना निर्माण केले असेल तर आपण आपल्याच मानवाला अस्पृश्य म्हणून दूर का लोटतो? हा प्रश्न त्यांनी ज्येष्ठांना विचारला. बालपणी विहिरीत बुडणाऱ्या एका अस्पृश्य सवंगड्यांला बसवने पाण्यात उडी घेऊन वर काढले, तेव्हा बसवच्या आजीने त्यांना “तू विटाळला आहेस, त्यामुळे तू आंघोळ करूनच घरात ये” असा दम भरला, तेव्हा बसवने आजीला प्रश्न केला “सर्व ईश्वराची लेकरे असतील तर तो अस्पृश्य कसा, तोही मानवच आहे? . त्यांनी बालवयापासूनच विषमतेला विरोध करून समतेचा आग्रह धरला. बसवण्णा हे बालपणापासूनच बंडखोर विचारांचे होते.
कारागिरांना देवालयात प्रवेश का नाही ?
अनेक देवदेवतांची पूजा करण्यापेक्षा एकाच ईश्वराची पूजा करावी, असे त्यांचे मत होते. ते महादेवाची (शिवाची) भक्ती करणारे एकेश्वरवादी होते. मुलांना जर मौजीबंधन होत असेल, तर तो अधिकार मुलींना का नाही? असा सवाल त्यांनी धर्ममार्तंडांना विचारला. यज्ञ यागात तेल तूप दूध प्राणी यांचा नाश करतात, परंतु गरिबांना साधी भाजी भाकरी देत नाहीत. विदुर पुरुष दुसरे लग्न करतात, परंतु विधवा स्त्रियांना लग्न करण्यास बंदी का? अशा अनेक प्रश्नांनी बसवण्णानी धर्ममार्तंडांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. बसवण्णा काळाबरोबर वाहत जाणारे नव्हते, तर कळाला थांबवून त्याला जाब विचारण्याची हिंमत त्यांच्यात होती. त्यामुळेच त्यांना युगप्रवर्तक म्हटले जाते. देवालय बांधणार्या कारागिरांना तुम्ही देवालयात प्रवेश का देत नाहीत? असा प्रश्न त्यांनी धर्ममार्तंडांना विचारला.
बालवयातील सुरुवातीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर बसवला पुढील शिक्षणासाठी कुडल संगम येथे पाठवण्यात आले. कुडल संगम हे कृष्णा – मलप्रभा नदीच्या संगमावर महत्त्वाचे तत्कालीन ज्ञानकेंद्र-धार्मिक केंद्र होते. गुरूंच्या सान्निध्यात त्यांनी भारतीय दर्शन शास्त्राचा अभ्यास केला. कन्नड बरोबरच संस्कृत साहित्य अभ्यासले. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचा विवाह त्यांच्या मामाची म्हणजेच बलदेव यांची कन्या गंगाबिंका यांच्या बरोबर झाला.
कर्णिक ते राज्याचे महामंत्री
मामा बलदेव हे कल्याणचा चालुक्य राजा यांचा मांडलिक कलचुरी राजा बिज्जल यांच्या मंगळवेढा येथील दरबारात मंत्री होते. पुढे कल्याणच्या चालुक्यांचा पाडाव झाला व तेथे कलचुरी राजा बिजल राज्य करू लागला. बसवन्ना मंगळवेढा येथील कोषागारात कर्णिक म्हणून नियुक्त झाले. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि काटकसरीने काम केले. त्यांनी गोरगरीबांना मोलाची मदत केली.त्यांनी चोख कारभार सांभाळला.अफरातफरीला पायबंद घातला. जनकल्याणा बरोबरच राज्याच्या कोषागारात वृद्धी केली. त्यामुळे राजा बिजलाची बसवण्णावर मर्जी बसली. बिज्जल राजाने बसवण्णाना राज्याचे महामंत्री केले.
राजेशाहीतील ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध
महामंत्री झाल्यावर बसवन्ना राजधानी कल्याण येथे आले. बसवण्णानी खूप चिकाटीने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कारभार केला.त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या.त्यांनी गरिब, उपेक्षित, वंचित वर्गाचे हित जोपासणारे कार्य केले. त्या काळात भारतीय राजेशहीवर ब्राह्मणी वर्चस्व होते. वर्णव्यवस्था, वेदप्रामाण्य, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीव्यवस्था याचे राजे लोक निमूटपणे पालन करत असत. त्याला राजा बिजलही अपवाद नव्हता, मात्र बसवण्णा यांचा वर्णव्यवस्था, वेदप्रामाण्य यज्ञयाग जातिव्यवस्था या अनिष्ट प्रथांना विरोध होता. त्यामुळे बिज्जल आणि बसवण्णा यांच्यामध्ये अंतर्विरोध सुरू झाला. त्याला दरबारातील धर्ममार्तंडांनी खतपाणी घातले, परंतु बिज्जलाचा बसवण्णाच्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे राजा बिज्जलला त्यांची नितांत गरज होती. सनातन्यांनी बसवन्नाविरुद्ध राजाकडे अनेक कागाळ्या केल्या, परंतु राजा बिजल सुरुवातीला बसवण्णा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, कारण बसवन्ना हे राजा बिजलापेक्षा अधिक लोकप्रिय आणि कल्याणकारी होते.
मानव हीच एक जात,माणसात भेदभाव नाही…
बसवण्णा यांनी राज्यातील शेतकऱ्यांना भरघोस मदत केली. खेड्यापाड्यातील अस्पृश्यना प्रेमाने जवळ केले. त्यांना अन्य- वस्त्रांची मदत केली. विहिरीवर पाणी सर्वांना पीऊ उद्या, भेदभाव करू नका, असा ते जनतेला उपदेश करत. बसवन्ना स्वतः अस्पृश्याच्या घरी जाऊन जेवण करत. शिवनागयाच्या घरी जाऊन बसवण्णानी जेवण केले, तेव्हा हे कृत्य वर्णाश्रमधर्माच्या विरोधात आहे म्हणून धर्ममार्तंडांनी राजा बिज्जलकडे तक्रार केली. परंतु महामंत्री बसवण्णा अजिबात नाहीत.राजा बिज्जल हा सनातन धर्माचा पुरस्कर्ता होता, तर बसवन्ना हे सनातन धर्माच्या विरोधात होते. बसवण्णानी अनिष्ट रूढी परंपरा यांना विरोध केला. केवळ इष्टलिंग धारण करावे बाकी अवडंबर न करावे, हा त्यांचा उप्रदेश होता. ईष्टलिंग धारण करतो तो लिंगायत होय. त्यांनी अन्य भेदभाव नाकारला, त्यामुळे बसवण्णाचा धर्म वाढीस लागला. त्यांना मोठा लोकाश्रय मिळाला. पूर्वाश्रमीच्या जाती सोडून अनेक लोक बसवण्णाचे अनुयायी झाले. त्यामध्ये रामन्ना हा गुराखी होता. चौदय्या हा नावाडी होता. मादिवळ माचय्या हा परीट होता. माळय्या हा लाकूडतोड्या होता. केशय्या बुरुड होता.चांदय्या दोरखंड तयार करणारा होता. काकय्या ढोर होता. संगन्ना वैद्य होता. मध्वण्णा हा पूर्वाश्रमीचा ब्राह्मण होता. हरळय्या चर्मकार होता. सोलापूरचे सिद्धरामय्या हे महान योगी बसवण्णाचे अनुयायी होते.त्यांनी सोलापुरात जनतेसाठी तलाव बांधला,शिवालय उभारले.बसवण्णानी मानव हीच एक जात मानली,माणसात भेदभाव केला नाही.
अनुभव मंटपाची स्थापना
बसवन्ना यांनी आपल्या विचारांच्या मंथनासाठी कल्याण येथे अनुभव मंटपाची स्थापना केली. या अनुभव मंटपात कोणताही भेदभाव नव्हता. सर्वजण समान होते. येथे प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार होता. येथे पुरुषाप्रमाणे स्त्रियांना देखील प्रवेश होता. अनुभव मंटपात एकूण ७७० सभासद होते, त्यापैकी ७० महिला होत्या. लिंगायत धर्मात पुरुष अनुयायांना शरण तर स्त्री अनुयायांना शरणी म्हणतात. या अनुभव मंटपात चर्चेच्या प्रसंगी अल्लंप्रभू अध्यक्ष असत. बसवन्ना यांनी अध्यक्षस्थान स्वतःकडे न घेता आपल्या सहकार्याकडे दिले. त्यात लोकशाही होती. अनुभव मंटप हा आधुनिक लोकशाहीचा पाया आहे.
या अनुभव मंटपात महायोगिनी अक्कमहादेवी या महान तत्वज्ञानी देखील होत्या. शिमोगा जिल्ह्यातील उडुतानी येथील त्या होत्या. षडरिप वर विजय मिळवणाऱ्या त्या महान तत्ववेत्ता होत्या. बसवन्ना यांनी स्त्रियांना ज्ञानार्जनाचे स्वातंत्र्य दिले. स्त्री-पुरुष हा भेदभाव त्यांनी नाकारला. अनुभव मंडपात प्रत्येकाला ज्ञानार्जनाची संधी निर्माण करुन दिली अनुभव मंटपात तत्वज्ञानावर खुली चर्चा चालत असे. या चर्चासत्रात बसवण्णाच्या पत्नी गंगाम्बिका आणि निलांबिका सहभाग घेत असत.बसवण्णा हे परिवर्तनाची सुरुवात कुटुंबापासून करणारे महान महापुरुष होते, तसेच त्यांनी बहिण अक्कनागम्मा यांना धार्मिक अधिकार दिले. अनुभव मंटपात अम्मावेने, सोमाविने, राणी महादेवी, मुक्तायाक्का, लखम्मा अशा महान स्त्रिया होऊन गेल्या.
बसवन्नाची क्रांतिकारक शिकवण
बसवण्णानी ‘कायकवे कैलास’ हा महत्त्वपूर्ण सिद्धांत सांगितला. श्रम हाच खरा मोक्ष आहे. त्यामुळे प्रत्येकाने श्रम करावे. ऐतखाऊ वृत्ती समाजासाठी घातक आहे. यज्ञयाग, भविष्य, कर्मकांड न करता प्रत्येकाने उत्तम काम करत राहावे, दुसऱ्याच्या श्रमावर जगू नये. त्यांनी स्वर्ग-नरक नाकारला. पण श्रमाचा आग्रह धरला. तसेच प्रत्येकाने दासोह म्हणजे गरजवंताला मदत करा, आपला अतिरिक्त संग्रह गरिबाला देणे, म्हणजेच दासोह होय. बसवन्ना १२ व्या शतकात केलेली ही आर्थिक समानतेची क्रांती आहे. चोरी करू नका, खोटे बोलू नका, नवससायास करू नका, संसार सोडून तीर्थयात्रेला जाऊ नका, जिवंत नागाला मारून चित्रातल्या नागाची पूजा करू नका, देह हेच देवालय आहे, पाय हे खांब आहेत, तर शीर हे शिखर आहे, आपले शरीर स्वच्छ ठेवा, मन निर्मळ ठेवा, हीच खरी भक्ती आहे. गरजेपेक्षा जास्त संपत्तीचा संग्रह करू नका, अशी बसवन्नाची क्रांतिकारक शिकवण होती.
महामंत्रीपदापेक्षा महाप्रबोधन महत्त्वाचे..
बसवन्ना यांच्या या कार्यामुळे राजा बिज्जलबरोबर मतभेद वाढत गेले. बसवन्नाने महामंत्री पदाचा त्याग केला. महामंत्रीपदापेक्षा महाप्रबोधन महत्त्वाचे आहे, हे बसवन्ना यांनी सिद्ध केले. बसवन्ना यांच्या लिंगायत धर्माचे अनुयायी भेदभाव मानत नसत, त्यामुळे पूर्वाश्रमीचा ब्राह्मण असणाऱ्या मध्वण्णाने आपली कन्या कलावती हिचा विवाह पूर्वाश्रमीचा चर्मकार असणाऱ्या हरळयाचा मुलगा शीलवंत याच्याबरोबर करण्याचे निश्चित केले. या विवाहाला राजा बिज्जल यांने सनातन्याच्या सल्ल्यावरून विरोध केला.हे कृत्य धर्मविरोधी आहे, म्हणून बसवांण्णावर राजाने प्रचंड दबाव आणला, परंतु बसवन्ना व त्यांचे अनुयायी मागे हटले नाहीत. बाराव्या शतकातील ही क्रांतिकारक घटना होती. शेवटी हा विवाह पार पडला. परंतु राजा बिज्जलाने सैन्य पाठवून विवाह कार्यावर हल्ला केला. त्यामध्ये मोठा रक्तपात झाला. बसवन्ना यांनी अहिंसेच्या मार्गाने प्रतिकार केला.
बसवण्णानी त्यानंतर कल्याण सोडले व ते आपल्या अनुयायांसह कुडलसंगम येथे गेले. तेथेच त्यांचा इसवी सन ११६७ साली मृत्यू झाला. ज्या कल्याणमधून त्यांना जावे लागले, त्याच कल्याणचे नाव आज बसवकल्याण असे आहे. बसवन्ना हे भारताच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात आमूलाग्र क्रांती करणारे महामानव आहेत. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली, तरी ते डगमगले नाहीत. त्यांना अनेक आमिष आली, परंतु ते मोहित झाले नाहीत. महामंत्री पद सोडून महाप्रबोधन करणारे ते महामानव आहेत. त्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !