Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : राज ठाकरे यांच्या सभेच्या आधी आंबेडकरी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

Spread the love

वंचित बहुजन आघाडीच्या शांतता मार्चला परवानगी नाकारून अमित भुईगळ यांना ताब्यात घेतले…

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील बहुचर्चित सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांनी शांतता मार्च काढण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती परंतु हा मार्च सकाळी काढा परवानगी देतो असे पोलिसांचे म्हणणे होते तर वंचितला संध्याकाळची परवानगी हवी होती त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर सभा उधळण्याचा इशारा दिलेले भीम आर्मीचे अशोक कांबळे यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली असल्याचे वृत्त आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार वंचित बहुजन आघाडीकडून राज ठाकरे यांची सभा असलेल्या परिसरातून शांती मार्च काढला जाणार होता. तर अमित भुईगल यांनी, आम्ही क्रांती चौकातून शांतता मार्च काढणार होतो असे म्हटले असून आम्ही गृहमंत्री आणि औरंगाबाद पोलिसांचा निषेध करतो असे म्हटले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था  अबाधित राहावी यासाठी अमित भुइगळ यांच्यासह १२ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती उपायुक्त दिपक गिऱ्हे आणि उज्वला वनकर यांनी दिली आहे.

भीम आर्मीच्या अध्यक्षाला मुंबईतच अटक

दरम्यान भीम आर्मीचे अशोक कांबळे रविवारी दुपारी औरंगाबादला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी मुंबई पोलिसांनी अशोक कांबळे यांना घाटकोपरमधून ताब्यात घेतले. तर वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादमधील माजी जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर अमित भुईगळ यांनी पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले. पोलिसांची भूमिका ही हुकूमशहासारखी आहे. राज ठाकरे यांनी ३ मे रोजीपर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, आम्ही मनसेला एकाही मशिदीवरील भोंगा उतरवून देणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे हे आव्हान आहे, असे अमित भुईगळ यांनी म्हटले.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर देवमन बकले यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त क्रांती चौक, पैठण गेट, औरंगपुरा भागातील महात्मा फुले पुतळा परिसर ते भडकल गेटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शांतता रॅली काढण्यासाठी अर्ज केला होता. तर पोलीस विभागाकडून या रॅलीला सकाळी ७ ते ९ या वेळेत परवानगी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्या संदर्भात वंचितकडून १ मे रोजी सकाळी ११ पर्यंत कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यातून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका नाही, असे स्पष्ट करत तसेच सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा असल्याने व पोलीस कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बंदोबस्तात व्यस्त असल्याने, वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीसाठी परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान राज ठाकरे यांच्या सभेस परवानगी देऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली होती. शहराध्यक्ष अहमद जलीस यांनी तसे पत्र पोलीस आयुक्तांकडे दिले होते. भोंगे काढा अन्यथा मशिदीसमोर हुनमान चालिसा म्हटली जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे. यामुळे शांतता भंग होईल असे वातावरण निर्माण झाले असून मुस्लिमांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे शांताता व सुव्यवस्था राखण्यासाठी सभेला परवानगी नाकारावी अशी विनंती करण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!